धुळे, दि.6- यंदाच्या खरीप हंगामाच्या तयारीस प्रारंभ झाला असून 4 लाख 58 हजार 100 हेक्टर क्षेत्रात लागवडीचे नियोजन केले आहे. यंदा ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ हे तत्व राबविले जाणार असून त्यासाठी कृषी यांत्रिकीकरणावर भर दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
नियोजनानुसार जिल्ह्यात होणा:या विविध पिकांसाठी सर्वसाधारण लागवड क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. ते असे : भात 7 हजार हेक्टर, ज्वारी 20 हजार 100 हेक्टर, बाजरी 77 हजार 400 हेक्टर, नागली 1 हजार 800 हेक्टर, मका 70 हजार हेक्टर, इतर तृणधान्य 1 हजार 400 हेक्टर, अशा एकूण 1 लाख 77 हजार 700 हेक्टर क्षेत्रात तृणधान्याची लागवड होईल.
कडधान्यात तूर 10 हजार हेक्टर, मूग 24 हजार हेक्टर, उडीद 8 हजार 200 हेक्टर व इतर कडधान्य 2 हजार 500 हेक्टर, अशा एकूण 44 हजार 700 हेक्टर क्षेत्रात कडधान्याची लागवड होईल.
गळीत धान्यात भुईमूग 18 हजार 200 हेक्टर, तीळ 2 हजार 600 हेक्टर, सोयाबीन 25 हजार हेक्टर, इतर गळीत धान्य 300 हेक्टर, अशा एकूण 46 हजार 100 हेक्टरवर गळीत धान्याची लागवड होईल. यंदा कापसासाठी 1 लाख 87 हजार 600 हेक्टर क्षेत्राचे नियोजन असून 2 हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड अपेक्षित आहे.
51 हजार 578 क्विंटल बियाण्याची मागणी
या वर्षाच्या खरीप हंगामाकरीता महाबीज कंपनीकडे 18 हजार 525 क्विंटल तर इतर खाजगी कंपन्यांकडे 33 हजार 53 क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविली आहे.डिसेंबर महिन्यात याबाबत कृषी आयुक्तालयास मागणीचे नियोजन पाठविले जाते. त्यानुसार आयुक्तालयातर्फे जानेवारी महिन्यात कंपन्यांना मागणीची अलॉटमेन्ट करण्यात येते.
कापूस बियाण्याची 4 हजार 400 क्विंटल मागणी
कापूस लागवडीसाठी बीटी बियाण्याची 4 हजार 300 क्विंटल व सुधारित कापूस बियाण्याची 135 क्विंटल अशा एकूण 4 हजार 435 क्विंटल बियाण्याची मागणी नोंदविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
1 लाख 26 हजार मे.टन खतांचे नियोजन
यंदाच्या खरीप हंगामाकरीता 1 लाख 26 हजार मेट्रीक टन खताचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात युरिया 62 हजार मे.टन युरिया, 10 हजार 600 मे.टन डीएपी, 9 हजार 500 मे.टन एमओपी, 6 हजार 800 मे.टन एसएसपी व 37 हजार 100 मे.टन अन्य (मिश्र) खते अशी विगतवारी आहे.
उन्नत शेती, समृद्ध शेतकरी तत्वावर भर
यंदा खरीप हंगामाकरीता उन्नत शेती, समृद्ध शेतकरी या तत्वानुसार शेतक:यांना तंत्रज्ञान प्रशिक्षण, जमीन आरोग्य पत्रिका वाटप, समृद्ध बियाणे उत्पादनावर तसेच ठिबक (सूक्ष्म) सिंचनावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी कृषी यांत्रिकीकरणावर जोर दिला जाणार आहे.