सावखेडा : बऱ्याच महिन्यांपासून खिरोदा-रावेर या रस्त्यावरील झुडपे खूप वाढलेली होती. त्यामुळे वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. या झुडपामुळे रस्ता अरुंद झाला होता व समोरील वाहनेही काही वेळेस लवकर दिसत नव्हती, यामुळे छोटे-मोठे अपघातही होत होते. वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. त्या अनुषंगाने ‘लोकमत’ ने वृत्त प्रकाशित केले होते. व याबाबत युवासेना उपतालुका प्रमुख किरण पाटील यांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तगादा लावला होता, याची दखल घेत या रस्त्यावरील वाढलेली झुडपे तोडण्याचे काम सुरू झाले असून खिरोदा- रावेर रस्ता आता जणू मोकळा श्वास घेत आहे. .
कळमोदा -उटखेडा रस्त्याचे काम कधी मार्गी लागेल?
कळमोदा -उटखेडा या रस्त्याचे भूमिपूजन माजी आमदार यांच्या हस्ते होऊन दीड ते दोन वर्षे उलटली असून काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरू झाले परंतु थोडा रस्ता झाल्यानंतर काम बंद झाले. या रस्त्याचे काम अद्यापपर्यंत सुरू झालेले नाही. तरी या रस्त्याचे काम कधी सुरू होणार व तालुक्यातील जनतेला न्याय केव्हा मिळणार ? असा प्रश्न जनतेमधून उपस्थित होत आहे. या रस्त्याचे काम सुरू करण्यामागे काय राजकारण चालू आहे ? असा सवालही जनतेमधून केला जात आहे. या रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लोकांमधून तक्रारी करण्यात आल्या आहेत; परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. तरी या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी जनतेमधून करण्यात येत आहे.
पुलाचे कामही समाधानकारक नाही
खिरोदा -सावखेडा रस्त्यावरील सावखेड्याजवळील पुलाचे काम समाधानकारक झालेले नाही.याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे व आमदारांकडे वेळोवेळी खूप तक्रारी केल्या; परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. या पुलाचे वरील फिनिशिंग अजूनही अपूर्णच असून या पुलावरून वाहने चालवताना वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी या पूलाची फिनिशिंग करून व दुरुस्ती चांगली करावी. अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे