ऑनलाईन लोकमत
नशिराबाद, दि.19 - येथील प्रगतीशील शेतकरी किसन भंगाळे यांची मुलगी अलका चौधरी यांनी त्यांच्या भावजयी आशा भंगाळे यांना आपली किडनीदान देऊन जीवदान दिले आहे. बहिणीच्या दातृत्वामुळे भावाचा संसार सावरला आहे.
नणंद-भावजयीच्या नाजूक नात्यातील मतभेद सर्वश्रुत आहे. मात्र यास अपवाद ठरवित दोघींनी नात्यात ठेवलेला स्नेह समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे. नणंदेने भावजयीला दीर्घ आयुष्याची भेट दिली असून भावाचा संसार नव्याने फुलविला आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर आशा भंगाळे व अलका चौधरी यांची प्रकृती चांगली आहे. नणंदने भावजयीसाठी केलेल्या कार्याबद्दल नशिराबाद येथे कौतुक केले जात आहे.
मूळचे नशिराबाद येथील रहिवासी व सध्या औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेले विठ्ठल किसन भंगाळे यांच्या प}ी आशा भंगाळे (49) यांना 2002 मध्ये किडनीवर सूज असल्याचे निदानानंतर औषधोपचार सुरू होते. दिवसेंदिवस आजार वाढत गेला. दोन्ही किडनी जानेवारी 2017 मध्ये पूर्णपणे निकामी झाल्याचे कळाल्यानंतर कुटुंब हवालदिल झाले होते.
भावाची धडपड व भावजयीच्या वेदना पाहून अस्वस्थ न होता धीर देत नशिराबाद येथील विठ्ठल भंगाळे यांची बहीण अलका चौधरी यांनी किडनी देण्याची इच्छा प्रकट केली. अलकाचा मुलगा तुषार व शालिक दोन मुले वैद्यकीय क्षेत्रातच कार्यरत आहे. त्यांनीही मामीला किडनीदानास अनुमती दिली. त्यामुळे सर्वाचाच आनंद गगनात मावेना. कायदेशीर बाबी व आवश्यक चाचण्या पूर्ण करुन औरंगाबाद येथे किडनी प्रत्यारोपण झाले. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने कुटुंबात आनंद व्यक्त होत आहे. त्यानंतर नणंद-भावजयींचे आनंदाश्रू वाहू लागले. दोघींची प्रकृती चांगली असल्याची माहिती तुषार चौधरी व विठ्ठल भंगाळे यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना दिली.
(वार्ताहर)