पाचोरा : येथील शाहूनगर (तलाठी कॅलनी) येथील रहिवासी व मूळचे बनोटी ता. सोयगाव येथील असलेल्या शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.येथील भडगाव रोडवरील शाहुनगर भागातील रहिवासी निंबा ऊर्फ छोटू चुडामण पाटील (वय ४४) यांनी घरात कुणी नसताना पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.मुलगी जळगाव येथे तर मुलगा व पत्नी शेतात गेलेले असताना दोन रोजी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केल्यानंतर त्यांच्यावर तीन रोजी सकाळी अकरा वाजता बनोटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.नोकरी गेल्याने संकटातनिंबा पाटील यांच्या नावे बनोटी (ता. सोयगाव) येथे चार एकर जमीन असून वि.का. सोसायटी व महाराष्ट्र बँकेचे सुमारे चार लाख रुपये कर्ज होते. ते येथील एका केमिकल कंपनीत नोकरीला होते. मात्र गेल्या पाच वर्षांपूर्वी सदर कंपनी बंद पडल्याने त्यांना नोकरी गमवावी लागली होती. तेव्हापासूनच त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते. काही दिवस त्यांनी पेट्रोल पंपावर काम केले होते. मात्र सततचा आर्थिक ताण, घराची वाढती जबाबदारी आणि आजाराला कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. गेल्या तीन वर्षांपासून शेतात पिकत नसल्याने कर्जाचा मोठा डोंगर डोक्यावर उभा राहिला होता.मुलगी जळगाव येथे महाविद्यालयात तर मुलगा व पत्नी बनोटी येथे शेतात गेले होते. मुलगा शेतातून घरी आल्यानंतर निंबा पाटील हे पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी, एक मुलगा, एक मुलगी व पत्नी असा परिवार आहे. ते येथील एल.आय.सी. एजंट व पत्रकार विजय पाटील यांचे मेव्हुणे होत.दिवसेंदिवस कर्जबाजारीपणा, नापिकी, आर्थिक संकटांमुळे पैशांअभावी व शेतातील पुरेशा उत्पन्नाअभावी शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या वर्षी खरीप हंगामात झालेल्या अतिपाऊस व अवकाळीमुळे निंबा पाटील यांच्या शेतातील उत्पन्नही गेले. अशा कारणांमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
निंबा ऊर्फ छोटू पाटील यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी ‘मी आजारीपणा नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करीत असून, माझ्या मृत्यूस कुणालाही जबाबदार घरु नये. मुलगी कांचन, मुलगा दादू, पत्नी सुनिता... मला माफ करा.... अशा आशयाची चिठ्ठी त्यांच्या खिशात पोलिसांना आढळून आली आहे. त्यांच्या आत्महत्येने घरातील कर्ता पुरुष गेल्याने दु:ख कोसळले आहे.