जळगाव : दुचाकीला मागून दुसऱ्या दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मुकेश मधुकर सपकाळे (रा. आसोदा, ता. जळगाव) या तरुणाच्या खूप्रकरणी किरण अशोक हटकर (२४, रा. नेहरुनगर, जळगाव) याला जळगाव जिल्हा न्यायालयाने जन्मठेप, १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची साधी शिक्षा सुनावली. अन्य पाच जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. बुधवार, १३ सप्टेंबर रोजी हा निकाल देण्यात आला.
२९ जून २०१९ रोजी रोहित मधुकर सपकाळे (रा. आसोदा) हा तरुण मू.जे. महाविद्यालयात दुचाकीने आला असताना त्याच्या समोर असलेल्या दुचाकीस्वाराने अचानक ब्रेक दाबल्याने रोहितच्या दुचाकीचा समोरच्या दुचाकीला धक्का लागला होता. त्यावरून समोरील दुचाकीवरील तीन जणांनी रोहितशी वाद घालत त्याला मारहाण केली होती. त्या वेळी त्याने तिघांची माफीदेखील मागितली, मात्र तिघे जण ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे रोहितने त्याचा मोठा भाऊ मुकेश मधुकर सपकाळे याला बोलविले. तो तेथे आला व काय झाले असे विचारत असताना तिघांनी दोन्ही भावांना मारहाण केली. यात किरण अशोक हटकर याने मुकेशच्या डोक्यावर व छातीवर चाकूने वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला व रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तिघे जण पळून गेले होते. यात मयताचा भाऊ रोहित सपकाळे याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचे तपास अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी काम पाहिले. तपासादरम्यान इच्छाराम पुंडलिक वाघोदे (२४, रा. समतानगर), किरण अशोक हटकर (२४, रा. नेहरुनगर, जळगाव), अरुण बळीराम सोनवणे (२७, रा. समतानगर), मयूर अशोक माळी (२२), समीर शरद सोनार (२४, रा. फॉरेस्ट कॉलनी), तुषार प्रदीप नारखेडे (२३, रा. यशवंत नगर) यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले होते.
२५ पानांचा लेखी युक्तीवाद
हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एस. वावरे यांच्या न्यायालयात चालला. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे फिर्यादी, पंच, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरसह ३० साक्षीदार तपासण्यात आले. याशिवाय सरकार पक्षातर्फे न्यायालयात तोंडी युक्तीवादासह २५ पानांचा लेखी युक्तीवाद देण्यात आला. आरोपीने गुन्ह्यात वापरलेला चाकू काढून देणे, न्यायवैद्यक प्रयोग शाळेचा अहवाल तसेच फिर्यादीने आरोपींना न्यायालयासमोर ओळखले हा पुरावा ग्राह्य धरून सहा जणांपैकी किरण हटकर याला जन्मठेप, १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची साधी शिक्षा सुनावण्यात आली. अन्य पाच जणांना संशयाचा फायदा देऊन निर्दोष सोडण्यात आले.
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी प्रभावी युक्तीवाद केला. त्यांना पैरवी अधिकारी तुषार मिस्तरी, नरेंद्र मोरे यांनी सहकार्य केले. आरोपींतर्फे ॲड. प्रकाश बी. पाटील यांनी काम पाहिले. या खटल्यादरम्यान रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोकॉ इकबाल पिंजारी यांनी सहकार्य केले.
विहीरीत फेकून दिला होता चाकू
घटनेनंतर किरण हटकर हा मोहाडी रस्त्याकडे पळून गेला होता. या रस्त्यावरील एका विहीरीत त्याने गुन्ह्यात वापरलेला चाकू फेकून दिला होता. तपासादरम्यान ही माहिती समोर आल्यानंतर विहिरीतील पाणी उपसून चाकू काढण्यात आला होता.
न्यायालय परिसरात मोठी गर्दी, पोलिस बंदोबस्तबुधवार, १३ सप्टेंबर रोजी या खटल्याचे कामकाज सुरू असताना न्यायालयाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी झालेली होती. तसेच परिसरात मोठा पोलिस बंदोबस्तदेखील होता.