जळगाव - शहरातील खडके चाळ परिसरातील महानगरपालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई केली जात नसल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांकडून नगरसेवक व मनपाकडे तक्रार करूनदेखील दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
हर्षवर्धन कॉलनीत दूषित पाणीपुरवठा
जळगाव - शहरातील हर्षवर्धन कॉलनी परिसरात गेल्या आठवडाभरापासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. सुरुवातीला काही मिनिटे अत्यंत दूषित पाणी येत असून, यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत मनपा पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करूनदेखील लक्ष दिले जात नसल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.
बालाजी पेठ परिसरातील पाणीचपाणी
जळगाव - शहरातील बालाजी पेठ परिसरातील मुख्य चौकात गेल्या काही दिवसांपासून पाइपलाइन फुटली आहे. याठिकाणी पाणीपुरवठा झाल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून, हजारो लीटर पाणी वाया जात आहे. तसेच रस्त्यावरदेखील पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. याठिकाणी रस्तादेखील खराब असून, याठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे लहान-मोठे अपघातदेखील होत आहेत.
रायसोनीनगरात चिखलामुळे नागरिक त्रस्त
जळगाव - शहरात अमृतअंतर्गत झालेल्या पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती चांगल्या प्रकारे झालेली नाही. त्यामुळे मुख्य शहरातील रस्त्यांची तर वाट लागलीच आहे. तर वाढीव भागातील रस्तेदेखील खराब आहेत. रायसोनीनगर भागातील मुख्य प्रवेशव्दारासमोरील रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. या चिखलामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. मनपाकडून याठिकाणी साधा मुरूमदेखील टाकला जात नसल्याने नागरिकांनी मनपाविरोधात संताप व्यक्त केला आहे.