जळगाव : सोने तारण योजनेसाठी बँक व ग्राहक यांच्यातील महत्त्वाचा घटक असलेल्या सोने मूल्यमापक अर्थात गोल्ड व्हॅल्युअर्सना संघटित करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यपातळीवर गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर जडे यांची नियुक्ती करण्यात आली.
कोरोनानंतर सोने तारण योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. यामध्ये तारण कर्जासाठी व्हॅल्युअर्स बँक व ग्राहक यांच्यातील महत्त्वाचा घटक ठरत आहेत. मात्र, त्याला जोखमीच्या तुलनेत योग्य मोबदला मिळत नसून, समाधानकारक सेवा देतानाही योग्य न्याय मिळत नाही. त्यामुळे या गोल्ड व्हॅल्युअर्सना संघटित करून भेडसावणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व त्यांना अद्ययावत माहिती देण्यासाठी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर जडे यांची नियुक्ती केली असून, तालुका व गाव पातळीवर देखील नोंदणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.