विनायक वाडेकर
मुक्ताईनगर : घातक व जीवघेणा असलेल्या मांजावर बंदी असतानाही त्याची विक्री करणाऱ्या शहरातील पूनम कलेक्शनमध्येे मुक्ताईनगर पोलिसांनी छापा टाकला. यात पतंगासह १९२० रुपये किमतीचा मांजा जप्त करण्यात आला.मकरसंक्रातींच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्यासाठी मांजाचा वापर होतो. मांजा नायलॉनचा असल्यामुळे गळ्यात व शरीरात अडकून अनेकांचा त्यात जीव गेला आहे. गेल्या आठवड्यात नाशिक शहरात रस्त्याने जाणाऱ्या महिलेच्या गळ्यात पतंगाचा मांजा अडकून जीव गेला होता. अत्यंत घातक असलेल्या या मांजाच्या विक्रीला शासनाने बंदी घातली आहे, असे असतानाही शहर व जिल्ह्यात मांजा विक्री होत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने धाडसत्र राबविण्याचे आदेश सोमवारी दिले. याबाबत मुक्ताईनगर येथील पोलीस ठाण्यात पो. कॉ. गोपीचंद सोनवणे यांनी दिलेल्या फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, सोमवारी दुपारी १२ वाजून ५४ मिनिटांनी मुक्ताईनगर येथील पूनम कलेक्शन या दुकानात छापा टाकला. तेव्हा त्या ठिकाणी प्लास्टिक कागदाचे पतंग व मांजाच्या ५० चकऱ्या, ३६० रुपये किमतीचा मांजा, २०० रुपयांच्या लहान चकऱ्या असा एकूण एक हजार ९२० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. याआधी पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कैलास भरासके, पोलीस उपनिरीक्षक नीलेश सोळुंके, सहायक फौजदार सादिक पटवे, देवेंद्र काटे तांनी शहरातील अर्धा डझन दुकानांची तपासणी केली. त्यात एका दुकानात घातक मांजा आढळला. जिल्हाधिकाऱ्यांच्या मानव, व्यक्ती, सजीव, प्राणी यांची व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात आणणारी कृती केल्याबद्दल अनिल पूनमचंद संचेती यांच्यावर भाग सहा, गुन्हा रजिस्टर नंबर पाच/ २०१२, भा.दं.वि. कलम १८८ व ३३६ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सादिक पटवे हे करीत आहेत.
न्यायालयाने घातली बंदीघातक मांजाच्या विक्रीस बंदी घालण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल असून त्याआधारावर न्यायालयाने बंदी घातली आहे.
नायलॉन मांजावर बंदी आहे. त्यामुळे विक्रेते असो की पतंग उडविणारे कोणीही मांजाचा वापर करू नये. संपूर्ण जिल्ह्यात मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. नागरिकांनीही या जीवघेण्या मांजाचा वापर करू नये. कुठे विक्री होत असेल तर जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती कळवावी.-डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक