जळगाव- सुप्रिम कॉलनीतील आकाश दिलीप परदेशी (वय-२०) या तरूणावर गुरूवारी रात्री १़३० वाजता चाकू हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नीलेश सपकाळे, अनिल घुले, राधे शिरसाठ (रा़ सुप्रिम कॉलनी), रूपेश सोनार (रा़ जैनाबाद) व यांच्यासह दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आकाश हा सुप्रिम कॉलनीतील गजानन महाराज मंदिराजवळ कुटूंबीयांसह वास्तव्यास आहे. तर एमआयडीसीतील जानव्ही पॉलिमर्स कंपनीत कामाला आहे. दरम्यान, गुरूवारी रात्री ११ वाजता तो घरी आला़ अन् जेवण झाल्यानंतर झोपून गेला. रात्री १.३० वाजेच्या सुमारास नीलेश सपकाळे, अनिल घुले, राधे शिरसाठ व रूपेश सोनार आणि आणखी दोन जण आकाश याच्या घरी आले आणि त्यांनी दार ठोठावला. आकाश याने दरवाजा उघडताच त्याला सहाही जणांनी घराबाहेर ओढून रस्त्यावर नेले. नंतर तु जास्त दादा झाला आहे का, असे म्हणत मारहाण केली. रूपेश याने चक्क त्याच्या हातातील चाकूने आकाशच्या डाव्या हातावर वार केला. नंतर उर्वरित पाचही जणांनी लाकडी दाड्यांनी त्याला मारहाण केली. मुलाना वाचविण्यासाठी आईला देखील सहाही जणांनी शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. अखेर मारहाण केल्यानंतर पाचही जण चारचाकी क्रमांक ०००७ मधून पळून गेले़ त्यानंतर आकाश याला लागलीच रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी शुक्रवारी मारहाण व चाकू हल्ला करणाऱ्या सहाहीही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुप्रिम कॉलनीत तरूणावर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 10:13 PM