लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच नॉन कोविड सुविधा सुरू होण्याची चिन्हे असून यासाठी टप्प्याटप्याने उपाययोजना केल्या जात आहेत. यात रुग्णालय आवारात रुग्णांच्या नातेवाईकांची दिशाभूल करणारी एजंट मंडळी यांच्यावर विशेष लक्ष राहणार आहे. त्यांना रोखण्यासाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद हे कोल्हापूर पॅटर्न वापरणार असून त्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.
डॉ. रामानंद हे कोल्हापुरला असताना त्यांनी त्या ठिकाणी रुग्णालय परिसरातील गर्दी कमी करण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला होता. अनेक एजंट हे शासकीय यंत्रणेवर खापर फोडून रुग्णांना खासगी रुग्णालयात नेत असतात. शासकीय यंत्रणेचेही नाव खराब होते, त्यामुळे अशा लोकांवर आता विशेष लक्ष राहणार असल्याचे यंत्रणेकडून समजते. यासाठी सीसीटीव्ही कॅमेर्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे. जास्तीत जास्त सुविधा या शासकीय रुग्णालयातच मिळाव्यात यासाठी यंत्रणेने प्रयत्नशील राहावे, अशा सूचनाही डॉ. रामानंद यांनी सर्व कर्मचाऱ्यांना आता बैठकांमध्ये दिलेल्या आहेत. त्यादृष्टीने विविध समित्यांचीही स्थापना झाली असून याचा रोज आढावाही घेतला जात आहे.
नॉन कोविडसाठी अशा आहेत उपाययोजना
पास शिवाय कोणालाही आत प्रवेश न देणे,
तासाभराच्या आत रुग्णाची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन त्याला घरी पाठवणे, किंवा तातडीने रुग्णालयात दाखल करून घेणे.
गेटवरच तपासणी होणे, कुठल्याही परिस्थतीत ठरलेल्या वेळेत ओपीडी सुरू होणे.
शासकीय सेवा उत्तम मिळाल्यास रुग्ण बाहेर जाणार नाही. त्यामुळे या सेवा अधिक सक्षम व सुटसटीत करणे.
रुग्णांच्या, नातेवाईकांच्या सर्व शंकाचे निरसन करण्यासाठी त्यांना कक्षांची माहिती देण्यासाठी वॉररूममध्ये नियमीत एक अधिकारी बसविणे.
सुरक्षा समिती, पार्किंग समिती यांच्या माध्यमातून त्यात्या बाबतीत योग्य खबरदारीची जबाबदारी सोपवून लक्ष ठेवणे, सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणे
आधुनिक मशिनरी अधिकाधिक प्रमाणात आणून रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देणे
पार्कींगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून रुग्णालया समोरील गर्दी टाळण्यावर हा भर राहणार आहे.