कळमसरे, ता.अमळनेर, जि.जळगाव : येथे शेतात काम करणाऱ्यांवर भरदिवसा अचानक हल्ला करून तब्बल पाच जणांना जखमी करणारा कोल्हा शुक्रवारी पहाटे कळकसरे-पाडळसे रस्त्यावर मृतावस्थेत आढळला. यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.प्रत्येकाला चावा घेऊन पळालेला कोल्हा भेदरलेल्या अवस्थेत शेत शिवारातून रात्री सडकेवर येताच त्याचा अंत झाल्याचे पाहणाºयांनी सांगितले. लांडगा नसून लहान अवस्थेतला कोल्हा असल्याचे सर्वांच्या लक्षात आले.दरम्यान, यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच शुक्रवारी सकाळी वनपाल वाय.यु.पाटील पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेत शिवाराची पाहणी केली व हिंस्त्र प्राणी नसल्याचे सांगून नागरिकांना घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले. हिंस्त्र प्राणी ओळखण्याच्या पाऊलखुणांसंदर्भात ग्रामस्थांना सचित्र माहिती दिली. यावेळी पाडळसे-कळमसरे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.वनक्षेत्रपाल आर.एस.दसरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल वाय.यु.पाटील, वनरक्षक दीपक पाटील, योगेश साळुंखे, वनमजूर पुंजू निकम, सदा पाटील, राजेंद्र पवार, मच्छिंद्र पाटील इत्यादी पथकातील कर्मचाºयांनी पशुधन अधिकारी डॉ.इंगोले यांना पाचारण करून शवविच्छेदनानंतर मृत कोल्हावर जागीच अंत्यसंस्कार करण्यात आले. या हल्ल्यात जखमी झालेल्या पाचही जणांवर धुळे येथे उपचारानंतर घरी पाठविण्यात आले.
कळमसरे शिवारात माणसांवर हल्ला करणारा कोल्हा मृतावस्थेत आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 6:47 PM