जळगाव - जिल्ह्याला लाभलेल्या सातपुड्याच्या जंगलांमध्ये अनेक दुर्मीळ वनस्पती व प्राण्यांची नोंद आतापर्यंत करण्यात आली असून, आता त्यात कोकण सुरण (अमार्फोफॅलस कॉनकेनन्सीस) व मालमपुरा रोटाला (रोटॅला मालमपुजहेन्सीज) या दुर्मीळ वनस्पतीची भर पडली आहे. जळगाव शहरातील एच.जे.थीम महाविद्यालयाचे डॉ.तन्वीर खान यांनी ही नोंद केली असून, सातपुड्याच्या जंगलात पहिल्यांदाच दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या या वनस्पतींची नोंद करण्यात आली आहे.
या नोंदीची ‘इंडियन जनरल ऑफ प्लांट सायन्स’ या विज्ञान पत्रिकेमध्ये या नोंदीच्या शोधनिबंध देखील प्रसिध्द करण्यात आला आहे. सातपुड्याच्या पर्वत रांगेमध्ये अनेक प्रकारच्या दुर्मीळ वनस्पती आढळून येत आहेत. या वनस्पती अभ्यासकांचे यश म्हणता येईल. एच.जे.थीम महाविद्यालयाचे वनस्पती अभ्यासक डॉ.तन्वीर खान यांनी अनेक दुर्मीळ वनस्पतींची सातपुडा मध्ये नोंद केली आहे. त्यांच्या या नोंदीत कोकण सुरण आणि मालमुरा रोटाला यांचीही भर पडली आहे.
कोणत्या भागात आढळते ही वनस्पतीपर्वत उतार आणि गवताळी भागामध्ये कोकण सुरण ही वनस्पती आढळूने येते. या वनस्पतींचे कंद वर्तुळाकार, लांबट पाने, फुलांचे आवरण फिकट तपकीरी, आतुन लाल व त्यामध्ये तीन प्रकारची फुले असतात. त्याचप्रमाणे पाणथळ व खडकाळ जागांवर मालमपुर रोटाला ही वनस्पती आढळून येते. नयनाकृती पाने, किरमीजी रंगाचे फुल, पानांना जोडून येतात. या वनस्पतींच्या नोंदी डॉ.खान यांनी पुणे विद्यापीठाचे डॉ.मिलींद सरदेसाई यांना पाठविले असता, त्यांनीही वनस्पतींच्या पृष्टीकरणास दुजोरा दिला आहे. तसेच या नोंदीसाठी डॉ.खान यांना अजहर शेख व उमेश पाटील यांचे सहकार्य लाभले.
सातपुडा पर्वत रांग ही दुर्मीळ वनस्पतींचा खजिना आहे. काळानुरूप इथे नव-नवीन दुर्मीळ वनस्पतींचा शोध लागत आहे. अशा वनस्पतींचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मध्य भारतातील सातपुडा पर्वत रांगेचे पूर्ण देशासाठी महत्व वाढत आहे.- डॉ.तन्वीर खान, वनस्पती अभ्यासक