अहमदनगरमध्ये कोपर्डीतील निर्भयाच्या घरासमोर तिचे स्मारक बांधण्यात आले आहे. त्याचे नाव युगंधरा स्मारक असे असून गुरुवारी कडेकोट बंदोबस्तात येथे सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
कोपर्डीला मिळालेल्या आश्वासनांचे काय झाले? याचा मागोवा घेण्यासाठी ‘लोकमत’ने कोपर्डीला भेट दिली. मुलीचे कुटुंब आजही त्या घटनेने सुन्न आहे. आर्थिक मदतीचे आम्हाला दिलेले आश्वासन सरकारने पाळले, असे मुलीच्या वडिलांनी सांगितले. मात्र गावाला आवश्यक सुविधा मिळालेल्या नाहीत. गावात चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्यानंतर मुलांना चार किलोमीटरवर कुळधरण किंवा शिंदे गावात जावे लागते. गावातील दोनशेहून अधिक मुले-मुली परगावी शाळेत जातात. त्यासाठी केवळ एक एस.टी. बस येते. अनेकांना सायकलवरुन किंवा पायपीट करत शाळेत जावे लागते. भैय्यूजी महाराजांनी मुलींसाठी दोन मिनी व्हॅन दिल्या. मात्र, त्याही अपुऱ्या पडतात. शासनाने गावातच अनुदानित माध्यमिक विद्यालय सुरु करावे, अशी ग्रामस्थांची मागणी होती. मात्र, त्याचा विचार झालेला नाही. कोणत्याही संस्थेने शाळेचा प्रस्ताव दिलेला नसल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. गावात आरोग्य उपकेंद्राला शासनाने मंजुरी दिली. इतर आरोग्य केंद्रातील पदे येथे समायोजित करुन ते चालवा, असा आदेश आहे. त्याच्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. ग्रामपंचायतने देऊ केलेल्या एका खोलीत तात्पुरते उपकेंद्र सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. घटनेनंतर वर्षभर मुलीच्या घरासमोर पोलिसांच्या राहुट्या व बंदोबस्त आहे. आरोपीच्या घरालाही बंदोबस्त आहे. कुळधरण येथे कायमस्वरुपी पोलीस चौकी उभारण्याचे शासनाने आश्वासन दिले. चौकी मंजूर झाली. मात्र, त्यासाठी जागाच नाही. पोलीस तात्पुरत्या राहुट्यांत कधी कुळधरण तर कधी कोपर्डीला असतात. गावासाठीचा कोपर्डी- राक्षसवाडी हा पाच किलोमीटरचा सव्वा कोटीचा रस्ता मंजूर झाला आहे. मात्र, त्याचेही काम प्रत्यक्षात सुरु झालेले नाही. रस्त्याच्या भूमिपूजनाचा फलक जानेवारीतच लागला आहे. कोपर्डीचा खटला नगरच्या सत्र न्यायालयात सुरु आहे. त्याचा निकाल लागल्यानंतरच न्याय मिळतो की नाही हे ठरेल, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. मुलीच्या हत्येनंतर शाळेने तिच्या विम्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठविला. मात्र, तो सुद्धा अद्याप मंजूर झालेला नाही. मुलीचे स्मारक भैय्यूजी महाराज यांनी अत्याचारित मुलीचे तिच्या घरासमोर ‘युगंधरा’ हे स्मारक उभारले आहे. न्यायालयाच्या निकालानंतर मुलीचा ‘ब्रॉण्झ’ चा पुतळा बसविण्याचे नियोजन आहे, सूर्योदय परिवाराचे सदस्य भाऊराव पाटील व समीर पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. १३ जुलैला प्रथम स्मृतिदिनी भैय्यूजी महाराज व मुलीच्या आईच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण होईल.