लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने मनपा प्रशासनाने बंद केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. जरी महाविद्यालये सुरु असली तरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील काही इमारती मनपाकडेच ठेवल्या होत्या. आता रुग्णांची संख्या पुन्हा सुरु झाल्यामुळे कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली आहे.
नोव्हेंबर महिन्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मनपा प्रशासनाने कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भविष्यात रुग्ण वाढल्यास हे सेंटर पुन्हा सुरु करावी लागण्याची शक्यता असल्याने मनपाने हे सेंटर आपल्या ताब्यात ठेवली होती. दरम्यान, आठवडाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जाणार आहे. सद्यस्थितीत मनपाकडून ११० बेडची पहिली इमारत सुरु केली जाणार आहे. रुग्णांची संख्या वाढल्यास इतरही इमारती देखील सुरु केल्या जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
एकाच परिसरात रुग्ण वाढल्यास परिसर सील
एखाद्या भागात रुग्णांची संख्या अधिक झाल्यास तो परिसर सील करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. तसेच रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जाईल. संपर्कात आलेल्या घरी किंवा लक्षणे असल्यास कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जाणार आहे. एका घरात रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास ते घर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले जाणार आहे.
वैद्यकीय विभागातील भरती करण्याची सूचना
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मनपाकडून मनपा वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. जून महिन्यात मनपाने काही जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या होत्या. आता पुन्हा रुग्ण वाढत असल्याने रिक्त जागा पुन्हा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार मनपा प्रशासनाने कार्यवाहीला सुरुवात केली असून, लवकरच जागांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
जेवण पुरविण्याबाबत निविदा
कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु केली जाणार असल्याने त्याठिकाणी रुग्णांना जेवण पुरविण्यासाठी व सफाईच्या कामांसाठी मनपाकडून दोन दिवसातच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून मनपाची संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली.