लोकमत न्यू नेटवर्क
जळगाव : दुसऱ्या लाटेत सर्वच यंत्रणांचे काम वाढले असून यात १०८ या रुग्णवाहिकेचाही समावेश आहे. या रुग्णवाहिकेची नियमित असलेली धाव या दुसऱ्या लाटेत वाढली आहे. गेल्या दोन महिन्यात रुग्णवाहिकेला येणारे कॉल्स वाढले आहेत. एका दिवसात सरासरी ३५ कॉल्स हे केवळ कोविड रुग्णांसाठीचे येत असल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हाभरात खासगी रुग्णवाहिकांची संख्या ५० पेक्षा जास्त आहे. मात्र, जादा दरांमुळे बहुतांश रुग्णांकडून १०८ रुग्णवाहिकेलाच प्राधान्य दिले जाते. जिल्हाभरात ३५ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यात ९ ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट व २६ बेसिक लाईफ सपोर्ट प्रकारातील आहेत. पहिल्या लाटेत ३५ पैकी ९ रुग्णवाहिका या कोरोनाच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना होत्या. इतर रुग्णवाहिका या प्रसूती, सर्पदंश, अपघात विषप्राशन केलेल्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहचविण्यासाठी होत्या. मात्र, नंतर रुग्णसंख्या वाढल्याने आधी १४ व नंतर पूर्ण ३५ रुग्णवाहिका या सॅनिटाईझ करून कोविड, नॉन कोविड रुग्णांसाठी वापरल्या जात आहेत. यात आता कोविडचे कॉल वाढल्याचे माहिती जिल्हा व्यवस्थापक डॉ. राहुल जैन यांनी दिली. दरम्यान, हे कॉल गेल्या काही महिन्यांपूर्वी कमी झाले होते. मात्र, रुग्ण वाढताच त्यात वाढ झाली आहे.
कर्मचारी बाधित
पहिल्या लाटेत रुग्णवाहिकेचे चालक व डॉक्टरही बाधित झाले होते. यात ५ चालक, ४ डॉक्टर व एक सुपरवायझर यांना कोरोनाची बाधा झाली होती.
दिवसाला कोविडचे किती कॉल
३५ शहर व ग्रामीण भागातून
आजपर्यंत एकूण कोविड रुग्णांची वाहतूक
१४ हजार ६४७
तीन महिन्यांत ३ हजारांपेक्षा अधिक कॉल्स
गेल्या तीन महिन्यांत १०८ या रुग्णवाहिकेला कोविडसाठी ३ हजारांपेक्षा अधिक काल्स आले आहेत. महिन्याला सरासरी ९०० कॉल्स होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
अर्धा ते एक तास रुग्णवाहिकेची वेळ
कॉल केल्यानंतर अर्धा ते एक तासाच्या आत रुग्णवाहिका ही उपलब्ध होत असल्याची माहिती आहे. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका ही सध्या कोविड व नॉन कोविड दोनही सेवांसाठी वापरली जात आहे. या ३५ रुग्णवाहिका असून त्या आपत्कालीन सेवेला प्राधान्य देऊन वापरल्या जात आहेत.