जळगाव : म्यूकरमायकोसिसचे रुग्ण व मृत्युसंख्या यांची पोर्टलवरील नोंद व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सांगत असलेली नोंद यात मोठी तफावत समोर आली होती. मात्र, आता म्यूकरमायकोसिसची लागण असलेल्या १३ रुग्णांचा मृत्यू हा म्यूकरने नव्हे तर कोरोनाने झाला आहे. त्याची नोंद मात्र, सरसकट म्यूकरमायकोसिसने मृत्यू अशी करण्यात आल्याचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले. या आकडेवारीबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांना पत्र दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात म्यूकरमायकोसिसमुळे १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद शासकीय पोर्टलवर करण्यात आली होती. शिवाय रुग्णसंख्याही अधिक असल्याची नोंद होती. प्रत्यक्षात जीएमसीकडून येणारी आकडेवारी ही कमी असल्याने याबाबत लोकमने वृत्त प्रसिद्ध केले होते. यावर अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी माहिती दिली आहे.
कोविड, नॉन कोविड रुग्ण
म्यूकरमायकोसिसचे अगदी सुरुवातीपासून दोन गटात रुग्ण आहेत. एक म्हणजे ज्यांना कोविडसोबतच म्यूकरचीही लागण झाली आहे आणि दुसरे म्हणजे कोविडनंतर म्यूकरची लागण झालेले. केवळ म्यूकरमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ असल्याचे जीएमसीकडून सांगण्यात येत आहे. तर ज्या १३ रुग्णांना म्यूकर होता. त्यांची ऑक्सिजन पातळी ही अत्यंत खालावलेली होती, त्यांना गंभीर प्रकारचा न्यूमोनिया होता. यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे विश्लेषण डॉक्टरांनी केले आहे. अशा स्थितीत त्यांचा कोविडने मृत्यू झाला असून तो म्यूकरने म्हणता येणार नाही, असे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी सांगितले.