जळगाव : बुधवारी अचानक रुग्णवाढ समोर आल्याने चिंतेचे वातावरण असताना गुरूवारी आलेल्या अहवालातून काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात भुसावळ, पाचोरा येथे ३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जळगावात शहरात एकही रुग्ण समोर आलेला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून २५ वर पोहोचली आहे. दरम्यान, चाळीसगाव तालुका प्रथमच शून्यावर पोहोचला आहे.
जळगाव शहरात बुधवारी ४ बाधित रुग्ण आढळून आले होते. गुरुवारी समोर आलेल्या आरटीपीसीआरच्या १४५७ अहवालांमध्ये २ तर ॲन्टीजनच्या ११०६ अहवालांमध्ये १ बाधित रुग्ण समोर आला आहे. जिल्ह्यातील एक रुग्ण बरा झाला आहे. जळगाव शहरातील सक्रिय रुग्णाची संख्या ९ वर पोहोचली आहे. भुसावळात सर्वाधिक १२ रुग्ण आहेत. त्या खालोखाल चोपडा २, पाचोरा १, मुक्ताईनगर १ या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्णांमध्ये ३ रुग्णांना लक्षणे असून अन्य २२ रुग्ण हे लक्षणेविरहीत असल्याची माहिती प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
चाळीसगाव प्रथमच शून्यावर
मध्यंतरी सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेला चाळीसगाव तालुका दोन्ही लाटांमध्ये प्रथमच शून्यावर आला आहे. तालुक्यातील एकमेव रुग्ण गुरुवारी बरा झाल्याने उपचार घेणाऱ्यांची संख्या शून्यावर आली आहे.