लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निवासी डॉक्टरांवर कोविडचा ताण वाढला आहे. त्यातच याच डॉक्टरांना वर्ग घ्यावा लागत आहे. मात्र ऑफलाईन क्लासेस बंद असल्याने या शिक्षकांना ऑनलाईन वर्ग घ्यावे लागत आहेत. कोरोनाच्या काळात वर्गदेखील वेळेवर घेता यावेत, यासाठी सर्व डॉक्टर शिक्षकांना आधीच व्हिडिओ रेकॉर्ड करून शिकवावे लागत आहे.
काही दिवस आधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड आणि नॉन-कोविड असे दोन प्रकार होते. त्या काळात नॉन-कोविड रुग्णांच्या उपचाराचे किंवा ऑपरेशन्सचे व्हिडिओ तयार करून ते विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेसवर दाखविले जात होते. त्यातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात होते. मात्र आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा एकदा नॉन-कोविड झाल्याने त्याची माहिती विद्यार्थ्यांना पाठविणे शक्य होत नाही. कोरोनाच्या काळात शिकवायचे कसे, असा प्रश्न आता पुन्हा उभा राहिला आहे. सध्या विद्यार्थ्यांना शिकविणे प्राध्यापक असलेल्या डॉक्टरांना कठीण झाले आहे.
विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर
निवासी डॉक्टरांवर ताण येत आहे. वर्ग ऑनलाईन होत आहेत. त्यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत. सध्या येथील बहुतेक विद्यार्थी घरी आहेत. ऑनलाईन वर्गांच्या माध्यमातून ते शिक्षण घेत आहेत. या ऑनलाईन वर्गांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामातून शिकण्याचा अनुभव खूप कमी मिळत आहेत. वर्ग कसेही आणि कितीही झाले तरी त्यांना पुन्हा या वर्षाच्या परीक्षा द्यायच्या आहेत. त्याचा परिणामदेखील विद्यार्थ्यांवर होत आहे.
निवासी डॉक्टरही येताहेत पॉझिटिव्ह
गेल्या काही दिवसांपासून निवासी डॉक्टर पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आलेले आणि सध्या नियमानुसार १४ दिवसांच्या विलगीकरणात असलेले असे मिळून १० डॉक्टर सध्या उपचार घेत आहेत. त्यामुळे उरलेल्या ३० डॉक्टरांवरील ताण अजूनच वाढला आहे.
जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर
४०
कोविड वॉर्डात ड्यूटी असलेले डॉक्टर्स
३०
महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी
४५०
कोट - सध्या या कोविडच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी येत आहेत. त्यांना ऑनलाईन शिकविणेदेखील आता कठीण झाले आहे. नॉन-कोविड असताना विद्यार्थ्यांना उपचार पद्धतीचे काही व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठविले जात होते. मात्र आता तेदेखील शक्य नाही.
- डॉ. मारुती पोटे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय