सुविधा :वर्षभरापासून बंद असलेली अमृतसर एक्स्प्रेसही १० एप्रिल पासून सुरू होणार
अमृतसर एक्स्प्रेस १० एप्रिलपासून पुन्हा सुरू होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगावमार्गे मुंबईकडे ये-जा करणाऱ्या कुशीनगर एक्स्प्रेसचा येत्या १३ एप्रिलपासून गाडी क्रमांक बदलण्यात येणार आहे. तर कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेली अमृतसर एक्स्प्रेस येत्या १० एप्रिलपासून पुन्हा सुरू होणार असल्याचे भुसावळ रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
मुंबई - गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस या गाडीचा सध्याचा क्रमांक ०१०१५-१६ आहे. १३ एप्रिलपासून हा क्रमांक बदलून ०२५३७-३८ असा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच रेल्वे प्रशासनातर्फे गाड्यांचे नाव न बदलता फक्त क्रमांक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिली सुरुवात कुशीनगर एक्स्प्रेसच्या क्रमांकाने करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता १३ एप्रिलपासून नव्या क्रमांकानुसारच या गाडीचे आरक्षण करता येणार आहे. दरम्यान, सध्या फक्त कुशीनगर एक्स्प्रेसचा क्रमांक बदलण्यात आला असून, वेळापत्रकात मात्र कुठलाही बदल करण्यात आला नसल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
इन्फो :
वर्षभरानंतर अमृतसर एक्स्प्रेस सुरू होणार
गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असलेली अमृतसर एक्स्प्रेसही बंद केली होती. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर इतर गाड्यांप्रमाणे ही गाडीही सुरू करण्याबाबत प्रवाशांमधून मोठ्या प्रमाणावर मागणी करण्यात येत होती. अखेर वर्षभरानंतर रेल्वे प्रशासनाने १० एप्रिलपासून ही गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे प्रवाशांमधून स्वागत करण्यात येत आहे.
इन्फो :
तिकीट आरक्षित असल्यावरच गाडीत प्रवेश
रेल्वे प्रशासनातर्फे येत्या १० एप्रिलपासून सुरू करण्यात येणाऱ्या अमृतसर एक्स्प्रेसमध्येही तिकीट आरक्षित असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. या गाडीचे जनरल तिकीट मिळणार नाही, अशी माहिती भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आली आहे.