जळगाव : तालुक्यातील म्हसावद येथील गिरणा नदीपात्रात हात-पाय धुण्यासाठी गेलेल्या मजुराचा पाय घसरल्याने गिरणेच्या डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजता घडली. सायंकाळी ५ वाजता आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाकडून घेण्यात आलेल्या शोधानंतर मृतदेह सापडला. दरम्यान, एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
किशोर श्रावण मराठे (वय ४०, म्हसावद) असे मयताचे नाव आहे. किशोर मराठे हे गावात हातमजुरीचे काम करत होते. मंगळवारी सकाळी ९ वाजता घरातून निघाले, त्यानंतर सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रात हात-पाय धुण्यासाठी गेले. त्याठिकाणी अचानक पाय घसरल्याने डोहात पडले. त्याठिकाणी खोली जास्त असल्याने, त्यांना बाहेर निघणे शक्य झाले नाही. नदीकाठावर कपडे धुणाऱ्या महिलांच्या लक्षात येताच, त्यांनी गावात सरपंचांना माहिती दिली. तसेच, पोलिसांनाही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सुरुवातीला गावातील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेह हाती न लागल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता पथकातील कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह सापडला, जिल्हा रुग्णालयात मृतदेह दाखल केल्यानंतर सायंकाळी शवविच्छेदन करण्यात येवून, मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला. मयत किशोर मराठे याच्या पश्चात आई, पत्नी, दाेन मुली, दाेन भाऊ असा परिवार आहे.