लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑक्सिजन टँक आणून पाईपलाईनचे काम करून तीन महिन्यांचा अवधी उलटला असला तरी या टँकला पेट्रोलियम ॲन्ड एक्सप्लोसीव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन अर्थात पेसोची मान्यताच मिळत नसल्याने हे टँक शोपीस ठरले आहे. याचा कसलाही उपयोग रुग्णालयासाठी करता येत नसून मोठा निधी यात अडकून पडला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला ज्यावेळी कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले. त्यावेळी या रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी यंत्रणा नव्हती. प्रत्येक कक्षामध्ये ऑक्सिजनचे टँक पुरवावे लागत होते. ही समस्या ओळखून व रुग्णांचे होणारे हाल ओळखून अखेर रुग्णालयात ऑक्सिजन पाईपलाईन टाकण्यात आली व त्याचे चार केंद्र बनविण्यात आले. या केंद्रावर ऑक्सिजन सिलिंडर जोडले की त्या माध्यमातून रुग्णालयाच्या आत रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होत होता. मध्यंतरी ऑक्सिजनची मागणी इतकी वाढली की, दररोज याचे नियोजन करण्यासाठी डॉक्टरांना तारेवरची कसरत करावी लागत होती. शिवाय यात थोडाही गोंधळ उडाल्यास रुग्णांच्या जीवाला धोका होता, या सर्व बाबी आणि शासनाकडचे आदेश या पार्श्वभूमीवर येथेही २० किलो लीटरचा ऑक्सिजन टँक उभारण्याचे नियोजन सुरू करण्यात आले. यात साधारण दीड कोटींच्या आसपास निविदा काढण्यात आला. त्यांना बराच अवधी गेला नंतर औरंगाबादच्या कंपनीला हे टेंडर मिळाले. बऱ्याच कालावधीने ऑक्सिजन टँक आला. त्याच्या लिक्विडसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या. त्याही पूर्ण झाल्या. टँकची उभारणी झाली. पाईपलाईनचे काम बरेच दिवस रखडले होते. ते पूर्ण झाले. मात्र, हा टँक सुरू करण्यासाठी पेसोची मान्यता आवश्यक आहे. मात्र, सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही ही मान्यता मिळत नसल्याने हा टँक सध्या केवळ शोपीस म्हणून उभा आहे.
कोरोना नसल्याने दुर्लक्ष
जीएमसीत सध्या केवळ तीन अतिदक्षता विभागात काहीच कोरोनाचे रुग्ण आहेत. कधी काळी अगदी एका दिवसाला ११०० सिलिंडर लागत होते. मात्र, सद्या रुग्ण कमी असल्याने ही संख्या पन्नासच्याही खाली आली आहे. अशा स्थितीत टँकचा तेवढा उपयोग नाही, असे गृहीत धरून रुग्णालय प्रशानाकडूनही टँक सुरू करण्यासाठी हव्या तशा हालचाली केल्या जात नसल्याचे चित्र आहे. पेसोकडून मान्यता मिळायला इतका अवधी का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.