पारोळा : तामसवाडी येथील बोरी धरणावर गेट उघडविणे बंद करणे हे जोखमीचे काम आज ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून केले जाते. ही धक्कादायक बाब धरणातील पाणी पातळी वाढल्यामुळे दरवाजे उघडण्याच्या वेळी १ रोजी निदर्शनास आली.बोरी धरण हे तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे धरण आहे. मात्र त्या तुलनेत धरणाची सुरक्षा हवी तशी नाही. धरणाच्या काठावर, धोकादायक ठिकाणांवर कोणीही कधीही येऊ शकते अशी स्थिती आहे. अशा व्यक्तींची साधी चौकशीदेखील केली जात नाही. धरणावर येणाऱ्यांची चौकशी केल्याशिवाय त्यांना धरण परिसरात जास्त वेळ थांबायला तसेच धरणाच्या आत जाण्यास नागरिकांना मज्जाव करावा. धरणाची सुरक्षा वाढविण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.रविवारी १ रोजी जोरदार पावसामुळे धरणाची पाणी पातळी अचानक वाढली. आणि ८५ टक्के धरण भरले. पाण्याची आवक जोरात असल्याने धरणाचे ५ दरवाजे उघडवावे लागले. हे दरवाजे कसे उघडावेत, याबाबत येथील कोणत्याही कार्मचाºयाला पुरेशी माहिती नाही. मग या धरणावर याच कामावरून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी यशवंत कुलकर्णी रा.तामसवाडी यांना बोलवून दरवाजे उघडण्यात आले. यासाठी स्वतंत्र कर्मचाºयाची नेमणूक अद्याप केलेली नाही अथवा येथील कर्मचाºयांनाही तसे प्रशिक्षण दिलेले नाही. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास धरणाचे दरवाजे उघडण्यासाठी संबंधित कामाचा कर्मचारी असणे गरजेचे आहे.२४ तास हवा वीजपुरवठाधरणस्थळी २४ तास वीजपुरवठा असायला हवा. पण या ठिकाणी ही १२ तासांचे भरनियमन आहे. ज्या दिवशी अचानक दरवाजे उघडण्याची वेळ आली त्यावेळी जनरेटरचा उपयोग करावा लागला. यातून प्रशासकीय उदासीनता दिसून येते.मेहुटेहूपर्यंत असलेल्या पाटचारी दुरुस्ती व शिवल्या नाल्याची जेसीबीच्या साह्याने साफसफाई करावी. तसेच बोरीतून पाणी सोडण्याची वेळ आल्यास ते पाटचारीत सोडून कंकराज धरणाचे पुनर्भरण करावे, अशा सूचना आमदार डॉ.सतीश पाटील यांनी दिल्या.