उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता : ८८ टक्के पेरणी; पावसाची अनियमितता कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एकीकडे राज्यात सर्वदूर जोरदार पावसाने थैमान घातले असताना, जिल्ह्यात मात्र पावसाची अनियमितता कायम आहे. यामुळे जिल्ह्यातील पिकांवर मोठा परिणाम होत असून, तब्बल २ लाख हेक्टर क्षेत्रावरील कापसाला फटका बसला आहे. अनेक भागांत पावसाच्या पाण्याअभावी हंगामपूर्व कापसासह कोरडवाहू क्षेत्रावरील कापसाचीही वाढ खुंटली आहे. यामुळे उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे कापसाचे २५ टक्के नुकसान झाले होते, तर या वर्षी पावसाअभावी कापसाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ८८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत, तर अनेक भागांत शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. आता दुबार पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असताना वरुण राजा मात्र जळगाव जिल्ह्यावर रुसून बसल्याचे पाहायला मिळत आहे. जून महिन्यात एकूण सरासरीच्या १५ टक्के तर आता जुलै महिन्यातही सद्यस्थितीत एकूण सरासरीच्या २० टक्के कमी पाऊस आहे. जुलै महिन्याचे अद्याप ११ दिवस शिल्लक असून, या उर्वरित दिवसांमध्ये तरी पावसाची तूट भरून निघावी, अशी अपेक्षा शेतकरी लावून बसले आहेत. आता जर अजून काही दिवस पावसाने पाठ फिरवली, तर दुबार पेरणीचे पीकही संकटात येऊन जाईल.
कापसाची फुले फुलण्याची प्रक्रिया थांबली
जिल्ह्यात मे महिन्यातच हंगामपूर्व कापसाची लागवड होत असते. त्यानंतर, जुलै महिन्यात कापसाला फुले फुलण्याची प्रक्रिया ही सुरू होत असते. मात्र, या वर्षी पावसाचे पाणी न मिळाल्याने कापसाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे फुले फुलण्याची प्रक्रियाही थांबली आहे. ही प्रक्रिया थांबल्यास हंगामही लांबेल व त्याचा परिणाम उत्पादनावरी होईल.
जिल्ह्यात मान्सून का रुसला
१. जळगाव जिल्ह्यात नेहमी अरबी समुद्राकडून वाहत येणाऱ्या वाऱ्यांमुळे पाऊस होत असतो. समुद्राकडून येणारे वारे, नंदुरबार, नाशिकमार्गे जिल्ह्यात दाखल होत असतात. मात्र, या वर्षी अरबी समुद्रात ढग तयार होत आहेत. मात्र, वाऱ्यांची दिशा उत्तर-पूर्व असल्याने कोकणात हजेरी लावून पाऊस थेट गुजरात, मध्य प्रदेशकडे रवाना होत असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिली.
२. मान्सूनचा नेहमीचा मार्ग यावेळेस भरकटलेला दिसून येत आहे. त्यामुळे सर्वदूर पाऊस होत असताना, जळगाव जिल्हा मात्र वंचित राहत आहे. वाऱ्याची दिशा बदलली, तर जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात होऊ शकते असेही डॉ.साबळे यांनी सांगितले. या वर्षी हवामान बदलाचा परिणाम मान्सूनवर दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.
तीन दिवस महत्त्वाचे
हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्यात ५० ते ७० टक्के पावसाची शक्यता सांगितली असली, तरी हा पाऊस अनियमित स्वरूपाचाच राहणार आहे. एखाद्या तालुक्यात एकाच वेळी चांगला पाऊस होत आहे, तर दुसरीकडे मात्र पाऊस होत नाही. जिल्ह्यात जळगाव, चोपडा, अमळनेर, धरणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुबार पेरणी झाली आहे. आता पुन्हा पावसाने दडी मारल्यास या पेरण्याही वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पुढील तीन दिवस महत्त्वाचे असून, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.