वरणगाव : येथील रेल्वे स्टेशनच्या पलीकडील सिद्धेश्वर नगरची निर्मिती होऊन सुमारे ३५ वर्षे झाली. परंतु आजतागायत येथील नागरिक विविध सुविधांपासून वंचित आहेत. या भागातील नागरिकांच्या विविध समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्रामुख्याने सिद्धेश्वरनगरकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे पुलाखाली नेहमी चिखल व गुडघ्याच्या वर पाणी साचलेले असते. त्या चिखलसदृश पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागते. त्यामुळे तेथे वाहने रुतून लहान-मोठे अपघात होणे नित्याचेच झाले आहे. तसेच पुलाखालील चिखल आणि पाण्याच्या प्रमुख समस्येसह घरकुलांची समस्याही आहे. याचबरोबर पिण्याच्या पाण्याची समस्या, रेशन कार्डची समस्या, रस्त्याची समस्या यासारखे अनेक प्रश्न या भागातील नागरिकांना भेडसावत आहे.
या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासााठी महिला मंडळ सिद्धेश्वर नगरच्या वतीने वरणगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदन देण्यात आले. यावर त्वरित विचार करून १५ दिवसांच्या आत काम चालू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. पत्रकावर महाराष्ट्र रक्षक सेना अध्यक्षा सविता माळी, सेनेचे विभाग प्रमुख उमाकांत झांबरे यांच्यासह सिद्धेश्वर नगरमधील नागरिकांच्या सह्या आहेत. मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदन देताना सिद्धेश्वर नगरच्या महिला व पुरुष नागरिक. (छाया : बाळू चव्हाण)