लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव तालुक्यातील कानळदा परिसरात लाहूरी, तितर या पक्ष्यांना पकडून हे पक्षी विक्री करण्याचा डाव वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांना दाखविलेल्या तत्परतेमुळे हाणून पाडला आहे. पक्षिप्रेमींनी घटनास्थळी जाऊन हा प्रकार उघडकीस आणून पक्षी ताब्यात घेतले. मात्र, झालेल्या धक्काबुक्कीत शिकारी मात्र पसार झाले आहेत.
कानळदा येथे दोन लोक तितर पक्षी विकत असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे रितेश भोई, ज्ञानेश्वर सपकाळे आणि दिनेश सपकाळे यांना रविवारी दुपारी २ वाजता मिळाली. ही माहिती मिळताच त्यांनी शोध घेऊन संबंधित व्यक्तींकडून चार पक्षी ताब्यात घेतले पक्ष्यांची पाहणी करत असताना दोन्ही शिकारी हिसका देऊन पसार झाले. दरम्यान, या झटापटीत दोन पक्षी बटन क्विल (लाहुरी) आणि दोन पक्षी फ्रँकोलीन (तितर) अशा चार पक्ष्यांना वाचवण्यात यश आले. पक्षी फासे लावून पकडले असल्याने ते किरकोळ जखमी झाले होते. तरी उडण्यायोग्य असल्याने त्यांना सांभाळायची आवश्यकता नव्हती. पक्षिमित्र रितेश भोई, ज्ञानेश्वर सपकाळे, दिनेश सपकाळे यांनी पक्षिमित्र ऋषी राजपूत यांना माहिती दिली. संस्थेच्या ग्रुपवर मार्गदर्शन घेत प्राथमिक उपचार करून त्यांना तत्काळ सुरक्षित अधिवासात मुक्त करण्यात आले.
कोट..
सध्या पावसाळ्यात रान ससे, मोर, तितर, लाहुरी, घोरपड, कासव सारख्या प्राणी पक्ष्यांची शिकार करणे सोपे असते. कोणताही वन्यजीव विकणे, शिकार करणे, त्याचे मांस खाणे त्यांचे अवशेष जवळ बाळगणे हा गुन्हा असून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ शिकार कलम अंतर्गत गुन्हा दाखल होऊन जबर शिक्षा होऊ शकते.
- रवींद्र फालक, मानद वन्यजीव रक्षक