नशिराबाद, ता. जळगाव : गावातून बोदवड बायपासच्या अलीकडे असलेल्या बोगद्याजवळ पावसामुळे मोठे पाणी साचून तलावसदृश स्थिती निर्माण झाली. या रस्त्यावर अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होत असून, वाहनधारकांचे या मार्गावर प्रवास करताना हाल होत आहे. महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ या ठिकाणी उपाययोजना करावी व वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मार्ग मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.
यासंदर्भात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटलांसह ग्रामस्थांनी न्हाईच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले व दखल घ्यावी, अशी मागणी केली. मात्र अद्याप यावरती कुठलाही तोडगा निघाला नसल्याने ग्रामस्थ संतापले आहे. एखादी मोठी जीवितहानी झाल्यानंतरच न्हाईला जाग येणार का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू असून, नशिराबाद गावातून उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या उड्डाणपुलाच्या आजूबाजूला सर्व्हिस रोडवर दोन्ही बाजूला जवळपास दोन ते तीन फूट पाणी साचत आहे. नशिराबाद गावापासून बोदवड- मलकापूरकडे जाणाऱ्या रस्त्याने दररोज हजारो वाहनांची ये-जा होत असते. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे तर या रस्त्यावरून मार्ग काढणे जिकिरीचे झाले होते.