लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील मोबाईल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोलाणी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच तळमजल्यात नेहमीप्रमाणे पावसाचे पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे पूर्ण मार्केटमध्ये दुर्गंधी पसरली आहे. याच तळमजल्यात पाणी साचत असल्याने चार महिन्यांपूर्वी तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने आंदोलन केले होते. आता महापालिकेत सत्तांत्तर होऊन सेनेची सत्ता आली असली तरी याठिकाणची समस्या कायम आहे. यामुळे आंदोलन करणाऱ्या सेनेने आता तरी या समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी मार्केटमधील दुकानदारांकडून केली जात आहे.
गोलाणी मार्केटमध्ये दररोज लाखोंची उलाढाल होत असते. जिल्हाभरातून ग्राहक येथे येत असतात. मात्र, मार्केटची स्थिती पाहिल्यास हे मार्केट मोबाईल पेक्षा कचऱ्याचेच आणि घाणीचे मार्केट म्हणून प्रसिद्ध होऊ लागले आहे. गोलाणी मार्केटमध्ये येणाऱ्या जवळ-जवळ सर्वच प्रवेशव्दारांसमोर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. तर मार्केटच्या मागील बाजूस खराब भाजीपाला व फळे फेकली जात असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. त्यातच आता तळमजल्यात पावसाचे व गटारीचे पाणी साचत असल्याने नागरिकांसह याठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तेव्हा विरोधी होते, आता सत्तेत आल्यामुळे समस्या तरी सोडवा
तळमजल्यात गटारीचे पाणी साचण्याचा प्रकार याठिकाणी नेहमीच होत असतो. याविरोधात चार महिन्यांपूर्वी शिवसेनेने आंदोलन केले होते. कागदी बोट तयार करून, त्या बोटींना आमदार, तत्कालीन महापौर, गटनेत्यांचे नाव देत त्या बोटी साचलेल्या पाण्यात सोडण्यात आल्या होत्या. तत्कालीन सत्ताधारी भाजपला ही समस्या सोडविता आली नाही. आता महापालिकेत सत्तांतर होऊन शिवसेनेची सत्ता आली आहे. त्यामुळे आंदोलन करणाऱ्यांना या समस्येची मोठ्या प्रमाणात जाण आहे. त्यामुळे सत्ताधारी ही समस्या प्राधान्याने सोडवतील अशी अपेक्षा व्यापारी बांधवांना लागून आहे.
एकमेव शौचालय बंद केल्याने अडचण
गोलाणी मार्केटमधील स्वच्छतागृहांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. मनपा आरोग्य विभागाने या मार्केटमधील स्वच्छतागृहांकडे लक्ष देणेच बंद केले आहे. त्यातच अनेक व्यापाऱ्यांनी काही स्वच्छतागृहांना कुलूप लावून ठराविक दुकानदारांसाठीच या स्वच्छतागृहांचा वापर केला जात आहे. एकमेव स्वच्छतागृह या मार्केटमध्ये सुरु होते. मात्र, त्याठिकाणी देखील काही जणांनी कुलूप लावल्यामुळे या मार्केटमध्ये सद्य स्थितीत एकही स्वच्छतागृह शिल्लक नाही. यामुळे या मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. मनपा आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.