जळगाव : कोरोना रुग्ण संख्येचे प्रमाण कमी झाल्यानंतर शासनाने सर्वत्र अनलॉक केल्यामुळे, रेल्वेप्रमाणे बसलाही प्रवाशांची संख्या वाढली आहे. ७ जूनपासून लॉकडाऊन उठविल्यानंतर, महिनाभरात एसटी महामंडळाच्या जळगाव विभागाने साडेतेरा कोटींच्या घरात प्रवासी उत्पन्न मिळवले आहे. यात सर्वाधिक २ कोटी १५ लाखांचे उत्पन्न जळगाव आगाराने मिळवले असून, सर्वात कमी उत्पन्न हे भुसावळ आगाराने मिळवले आहे.
कोरोनामुळे गेल्या महिन्यात १ मे पासून कडक लॉकडाऊन करण्यात आल्याने, एसटी महामंडळाची सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद होती. फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच काही तालुक्यांना बस सोडण्यात येत होत्या. कोरोनामुळे महामंडळाची ९० टक्के सेवा बंद असल्यामुळे एकट्या जळगाव विभागाचे १८ कोटींच्या घरात आर्थिक नुकसान झाले. मात्र, शासनाने गेल्या महिन्यात ७ जूनपासून लॉकडाऊन पूर्णतः उठविल्याने महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे पूर्वीप्रमाणे सर्व मार्गावर बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच बसमधील ५० टक्के प्रवासी क्षमतेची अटही रद्द केली आहे. त्यामुळे सेवा सुरू झाल्यापासून महिनाभरात महामंडळाने साडेतेरा कोटींच्या घरात कमाई केली आहे. तसेच आता परराज्यातही सेवा सुरू केल्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात अधिक वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले.
अनलॉकनंतर जिल्ह्यातील आगारनिहाय महिनाभराचे उत्पन्न
आगार उत्पन्न
जळगाव : २ कोटी १५ लाख ९१ हजार
यावल : १ कोटी १ लाख ७८ हजार
चाळीसगाव : १ कोटी ३१ लाख ८९ हजार
अमळनेर : १ कोटी १७ लाख ५७ हजार
चोपडा : २ कोटी ९ लाख ६७ हजार
जामनेर : १ कोटी ३९ लाख ३ हजार
रावेर : १ कोटी ९ लाख ८७ हजार
मुक्ताईनगर : ९८ लाख ८७ हजार
पाचोरा : १ कोटी २७ लाख ४५ हजार
भुसावळ : ९१ लाख १६ हजार
एरंडोल : ९५ लाख ६३ हजार
एकूण : १३ कोटी ६५ लाख ४४ हजार
इन्फो :
अनलॉकनंतर प्रत्येक मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली आहे. ज्या मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे, त्या मार्गावर जास्त बस सोडण्यात येत आहे. त्यामुळे अनलॉक नंतर महिना भरात साडेतेरा कोटींच्या घरात उत्पन्न मिळाले आहे. आता गुजरात मार्गावरही सेवा सुरू झाल्यामुळे, उत्पन्नातही अधिक वाढ होणार आहे.
-भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव