सचिन देव
जळगाव : कोरोनामुळे दोन वर्षांनंतर पंढरपूरच्या आषाढी यात्रोत्सवात विठूरायाचे दर्शन घेता येणार असल्याने, जिल्ह्यातील अनेक भाविक पंढरपूरला गेले होते. त्यामुळे यंदा एसटी महामंडळाच्या जळगाव विभागाने १ कोटी ९ लाखांच्या घरात कमाई केली आहे. विशेष म्हणजे दरवर्षी ५० लाखांच्या घरात मिळणारे उत्पन्न यंदा १ कोटींच्यावर मिळाल्याने, लालपरीला खरोखर पंढरीचा विठूराया पावला, असा सूर कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
पंढरपूरच्या यात्रोत्सवासाठी महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे जिल्ह्यातील विविध आगारांतून ६ जुलैपासून सुमारे १५० बसेस सोडण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्यापूर्वीच जिल्ह्यातील अनेक गावांमधून महामंडळाच्या बसेस पंढरपूरला रवाना झाल्या. महामंडळातर्फे ‘गाव तिथे बस’ उपक्रमांतंर्गंत किमान ३५ नागरिक एकत्र आल्यावर, संबंधित गावातून थेट पंढरपूरसाठी बस सोडण्यात येत होती. त्यामुळे या सुविधेचा जिल्ह्यातील अनेक गावांनी फायदा घेतला होता.
यंदा दुप्पट उत्पन्नाचा विक्रम
महामंडळाच्या जळगाव विभागाला दरवर्षी पंढरपूर यात्रोत्सवात ५० लाखांच्या घरात उत्पन्न मिळते. मात्र, यंदा १ कोटी १० लाखांच्या घरात उत्पन्न मिळाल्याने, महामंडळाने आतापर्यंतच्या उत्पन्नाचा विक्रम मोडला आहे. महामंडळातर्फे भाविकांचा वाढता प्रतिसाद पाहता २०० वर बसेस पाठविण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सर्वाधिक उत्पन्नात जळगाव आगाराने प्रथम क्रमांक पटकविला असून, दुसरा क्रमांकावर चोपडा आगाराने मिळविला आहे.
यंदा पंढरपूर यात्रोत्सवासाठी सुरूवातीपासूनच बसेसचे नियोजन व प्रवाशांना तत्काळ बसेसची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे १ कोटी १० लाखांच्या घरात उत्पन्न आले आहे. सर्व चालक, वाहक, वाहतूक विभाग व यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध वाहतुकीमुळे यश मिळाले याचा आनंद आहे.दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी