जळगाव : पथदिवे नसल्याने अंधराचा फायदा घेत काही चोरट्यांनी शहरातील केळकर मार्केटमधील दोन कपड्यांची दुकाने फोडून १० हजारांपर्यंतची रोकड लंपास केली. परिसरातील गोरखा आल्यानंतर रविवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. सकाळी साडेतीनच्या सुमारास ही चोरी झाली असून, सीसीटी कॅमे-यात चोरटे बाहेर पडताना कैद झाल्याची माहिती आहे. दरम्यान, चोरट्यांनी बळीरामपेठेतील एका अपार्टमेंटमध्ये हात साफ केले असून, दत्त मंदिराची दानपेटी फोडल्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
सिंधी कॉलनीतील रहिवासी प्रदीप लालचंद कटारिया तसेच मनोज हुकूमचंद दुग्गड यांची केळकर मार्केटमध्ये अनुक्रमे बाबा गारमेंट आणि रिशभ होजिअरी अशी शेजारी-शेजारी दुकाने आहेत. नेहमीप्रमाणे दोघांनी शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास दुकानांना कुलूप लावून ते घरी गेले. रविवारी पहाटे साडेसहा वाजता कटारिया यांना एक फोन आला; मात्र झोपेत असल्याने त्यांनी ८ वाजता संपर्क केला असता, शहर पोलीस ठाण्यातून ही घटना उघडकीस आली. कटारिया व दुग्गड यांनी तातडीने दुकान बघितले असता, दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. दुग्गड यांच्या दुकानातून ८ ते १० हजारांची रोकड व एक कागदपत्रांची बॅग तर कटारिया यांच्या दुकानातून ७०० रुपयांपर्यंत रोकड लांबविल्याचे यावेळी निदर्शनास आले. मनोजकुमार दुग्गड यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उमेश भांडारकर हे करीत आहेत.
स्क्रू ड्रायव्हर पडून
चोरट्यांनी स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने लॉकर उघडले आणि रोकड लांबविली तर बिल बुक खुर्चीवर ठेवले होते. स्क्रू ड्रायव्हर दुकानातच सोडून चोरटे पसार झाले. मिळालेल्या माहितीनुसार शेजारील एका दुकानातील सीसी फुटेजमध्ये हे चोरटे शिवाजीनगरकडे जात असल्याचे दिसले आहे.
पथदिवे नाहीत
केळकर मार्केट परिसरात पथदिवे नाहीत, यामुळे रात्री या परिसरात अंधराचे साम्राज्य असते. बऱ्याच वेळा आम्ही महापालिकेला याबाबत कल्पना दिली; मात्र परिसरात पथदिवेच बसविले जात नसल्याचे या दुकादारांनी सांगितले.
गव्हाची गोणीही लंपास
बळीराम पेठेतील स्वप्निल अपार्टमेंटमध्येही चोरट्यांनी डल्ला मारला. शिवाय दत्त मंदिराच्या दानपेटीचेही कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. स्वप्निल अपार्टमेंटमधील रहिवासी विजय देशमुख यांच्या घरातून ३० किलो गव्हाची गोणी आणि १,५०० रुपयांचे दोन होम थिएटर चोरट्यांनी लांबविले. शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनस्थळी पाहणी केली.