लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : लग्न समारंभात वधू-वरांचे वऱ्हाडी धामधुमीत असतांना अज्ञात चोरट्यांनी काही महिलांच्या अंगावर अंग खाजणारी वस्तू फेकून त्यांचे लक्ष विचलीत करून दागिने व रोख रकमेसह सुमारे साडे तीन लाख रुपयांचा ऐवज असलेली पर्स लंपास केल्याची घटना ८ रोजी दुपारी अडीच वाजता धुळेरोडवरील विराम लाॅन्स येथे घडली.कोडगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राजू निंबा कुमावत यांच्या मुलीचा विवाहाची धामधूम सुरू असतांना वऱ्हाडी मंडळी गडबडीत होते. यावेळी राजू कुमावत यांच्या पत्नीकडे असलेल्या पर्समध्ये ९८ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, दोन लाख ३५ हजार रुपयांची रोकड असा एकूण तीन लाख ३३ हजार पाचशे रुपयांचा ऐवज होता. ही पर्स तिने त्यांच्या आईकडे सांभाळायला दिली.
यादिवशी दुपारी अडीच वाजता त्यांच्या दोघां नातेवाईकांच्या अंगावर कोणी तरी पाठीमागून वस्तू फेकली.त्यामुळे या दोघांना अंगावर खाज येवू लागली. त्यावेळी राजू कुमावत यांच्या सासूबाई यांनी पर्स खाली ठेवली व त्या वऱ्हाडीच्या अंगावरील वस्तू झटकली .नंतर त्या पर्स घेण्यासाठी पाठीमागे वळल्या असता त्याचक्षणी पर्स गायब झाली. शोध घेवूनही पर्स मिळून आली नाही. ९ रोजी राजू कुमावत यांच्या फिर्यादी वरून ग्रामीण पोलीसात कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.