भुसावळ : शहरातील खडका रोडवरील रॉकेल डेपोजवळ रात्रीच्या वेळेस अज्ञात चोरट्यांनी भिंतीवरील लोखंडी ग्रील ओलांडून बंद घरात प्रवेश करून शिक्षकाच्या घरातून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.
शहरातील बी.झेड. हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून सेवारत असलेले शेख अल्ताफ शेख हुसेन हे घराला कुलूप लावून यावलला गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजेला शाळेत आले. त्या परिसरात पिण्याचे पाणी आल्याची माहिती मिळताच ते टाकीमध्ये पाणी भरण्यासाठी घरी गेले. तेव्हा त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून कुलूप खाली जमिनीवर दिसल्याने घरमालकाने आत प्रवेश केला. घरातील कपाट तुटलेले होते. तसेच त्यांच्या पत्नीची पर्स व घरातील सामान अस्ताव्यस्त झालेला होता. चोरट्यांनी घरातून शिक्षक शेख अल्ताफ शेख हुसेन यांचा तीन महिन्यांचा ७० हजार रुपये पगार, गळ्यातील पोत, अंगठी, गोठ ५ तोळे तसेच घर बांधकाम करण्यासाठी पी.एफ. काढलेले दीड लाख रुपये रोख असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. घरमालकाने झालेल्या घटनेची माहिती पोलीस स्टेशनला माहिती दिली. घटनास्थळी पोलीस अधिकारी पोहचून पाहणी केल्याची माहिती शेख यांनी दिली.