अमळनेर : घराच्या मागील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून महिलेच्या घरातील आठ लाखांचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना ताडेपुरा येथे बुधवारी रात्री ९ ते १२ वाजेदरम्यान घडली.
रेखा अनिल लांडगे ही महिला बुधवारी, दि. २८ रोजी रात्री नऊ वाजता घराला कुलूप लावून मुलांसह बहादरपूर रोडवरील खळेश्वर कंजरवाड्यात हळदीच्या कार्यक्रमाला गेली होती. रात्री १२ वाजेच्या सुमारास ती परत आल्यावर घराचा दरवाजा तुटलेला दिसून आला. घरातील कपाट पाहिल्यावर त्याचे लॉकरही तोडलेले दिसून आले. कपाटातील २ लाख ४० हजार रुपये किमतीचे ६ तोळ्यांचे सोन्याचे तीन नेकलेस, १ लाख २० हजार रुपये किमतीचे ३ तोळ्यांचे सोन्याचे तीन काप, २४ हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल, ८० हजार रुपये किमतीच्या २० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चार अंगठ्या, आठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातले किल्लू व बाळ्या, ४० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे मणीमंगळसूत्र, २० हजार रुपये किमतीचे पेंडल व मणी, ७ हजार ५०० रुपये किमतीचे १५ भार वजनाचे चांदीचे पैंजण, ५ हजार रुपयांचा १० भार चांदीचा कंबरेचा पट्टा व कपाटातील २ लाख ५० हजार रुपये रोख असा एकूण ७ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला आहे.
घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहायक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, दीपक माळी, रवी पाटील यांनी भेट दिली. तसेच श्वानपथक व अंगुली मुद्रा पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकाचे विनोद चव्हाण व अंगुली मुद्राचे सहायक पोलीस निरीक्षक जी. के. कांबळे, साहेबराव चौधरी यांनी विविध वस्तू व कपाटावरील ठसे घेतले.
रेखा लांडगे यांच्या पतीचे पाच महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे. महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेने श्रावण श्याम संदानशिव व बंटी ऊर्फ विशाल नाना बिऱ्हाडे यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे करीत आहेत.