लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मुलाच्या घरी जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या वृद्ध महिलेच्या पर्समधून ३१ हजार रुपयांचे दागिने लंपास झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभद्राबाई तायडे या विसनजीनगरात पती पुंडलिक यांच्यासह वास्तव्यास आहेत. मुलगा दीपक हा द्वारकानगरात राहतो. त्यामुळे सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता तायडे दाम्पत्य मुलाची भेट घेण्यासाठी विसनजीनगरातून रिक्षाने निघाले. दरम्यान, पाच वाजेच्या सुमारास बजरंग बोगद्याजवळ रिक्षा नादुरुस्त झाली. त्यामुळे रिक्षाचालकाने तायडे दाम्पत्यास त्याच ठिकाणी उतरवून दिले. सुभद्राबाई यांनी कमरेला लावलेल्या पिशवीतून पैसे काढून रिक्षा भाडे दिले व पिशवीत ठेवलेले सोन्याचे दोन ग्रॅमचे मणी, ४ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, २ भाराचे चांदीचे जोडवे पाहिले असता, त्यांना ते गायब झालेले दिसून आले.
पोलीस ठाण्यात घेतली धाव
काही वेळातच चालक हा रिक्षा दुरुस्त करून तेथून निघून गेला. तायडे दाम्पत्याने दुसरी रिक्षा करून मुलाचे घर गाठले व संपूर्ण हकीकत सांगितली. रिक्षात आणखी तीन महिला होत्या, अशीही माहिती त्यांनी दिली. सोमवारी सायंकाळी लागलीच सुभद्राबाई यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार ३१ हजार रुपये किमतीचे दागिने चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.