लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे जळगाव ते चाळीसगाव या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. या रस्त्याचे बहुतांश काम झालेले असले तरी जळगाव ते भडगाव यादरम्यान ९.२ किमी आणि भडगाव ते चाळीसगाव या दरम्यान ३.२५ किमीचे काम अजूनही अपूर्णच आहे. या कामात भूसंपादनाचा अडसर आहे. भूसंपादनाचे काम अजूनही पूर्ण झालेले नसल्याने रस्तादेखील अपूर्णच आहे.
२०१७ मध्ये या कामाला सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर २०१९-२० पर्यंत या रस्त्याचे काम सुरू होते. जेथे भूसंपादनाचा अडसर नव्हता. तेथे कामाला वेग आला होता. जळगाव तालुक्यात वडली आणि पुढील काही गावांजवळ भूसंपादनाचे काम अपूर्णच राहिले आहे. त्यासोबतच भडगाव आणि चाळीसगाव या दरम्यानदेखील सव्वातीन किमीचा रस्ता हा अपूर्ण आहे. संपूर्ण रस्ता शंभर किमीचा आहे. जळगाव शहराच्या बाहेर असलेल्या देवकर महाविद्यालयाजवळून हा रस्ता सुरू होतो. तेथून पुढे हा रस्ता दोन पदरी करण्यात आला आहे.
रस्ता अपूर्ण असल्याने अडचण
बहुतांश रस्त्याचे दुपदरी करण्यात आले आहे. मात्र १२ किमीच्या अंतराचे काम अजूनही झालेले नाही. त्यामुळे वाहनधारक वैतागतात. रात्रीच्या वेळी वेगाने येणाऱ्या वाहनांना येथे खड्डा आणि खडी किती आहे. हे कळत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्यांवर आली माती
जळगाव शहरापासून जवळच असलेल्या देवकर महाविद्यालयाजवळ सिमेंटच्या या रस्त्यावर मातीचे ढिगारे लागले आहेत. तसेच एका बाजुने माती रस्त्यावर आली आहे. यात पावसामुळे चिखल तयार होतो आणि काही जण घसरुन पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे ही माती लवकरात लवकर काढण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
कोट - जळगाव ते चाळीसगाव या रस्त्याचे शंभर किमीपैकी १२ किमीचे काम भूसंपादनामुळे अपूर्ण आहे. बाकीचा रस्ता पूर्ण तयार झाला आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली की हे कामदेखील लवकर पूर्ण होईल.
- विकास महाले, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण