वाहने स्क्रॅब करणाऱ्या दुकानदारांना दोन दिवसांचा अल्टीमेटम; सोमवारी मनपाकडून कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा चौक ते कालंका माता चौकादरम्यान असलेल्या ट्रान्सपोर्ट नगराला सुरू असलेला वाहने स्क्रॅप करण्याचा व्यवसाय मनपाने बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत, तसेच ही जागा दोन दिवसात खाली करण्याचा आदेश मनपा प्रशासनाकडून या ठिकाणच्या दुकानदारांना दिला आहे. सोमवारपर्यंत ही जागा न सोडल्यास मनपा अतिक्रमण निर्मूलन विभाग व जिल्हा पोलीस विभागाकडून संयुक्तिक कारवाई करून ही जागा ताब्यात घेण्यात येणार आहे.
शहरातील १४७/१ ब मधील खुल्या जागेवर अनेक व्यावसायिकांनी अनधिकृत दुकाने थाटून, याठिकाणी वाहने स्क्रॅब करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. याबाबत लोकशाही दिनामध्ये मनपा प्रशासनाकडे तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत मनपा प्रशासनाने ही जागा ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत मनपाने याठिकाणच्या व्यावसायिकांना नोटीसा बजाविल्या आहेत. दोन दिवसात सर्व दुकाने बंद करून, आपले साहित्य उचलण्याच्या सूचनाही मनपाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, कारवाई करताना वाद निर्माण होऊ नये म्हणून पुरेश्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई होणार असल्याची माहिती मनपाकडून देण्यात आली आहे. तसेच याठिकाणी कारवाई झाल्यानंतर ही जागा ताब्यात घेऊन याठिकाणी कुंपण भिंत तयार करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत.
भंगार बाजाराला अभय का ?
एकीकडे ट्रान्सपोर्ट नगराला लागून असलेली मनपाची जागा ताब्यात घेण्याबाबत मनपा प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली असताना, दुसरीकडे अनेक वर्षांपासून मुदत संपलेली असताना भंगार बाजार ताब्यात का घेतला जात नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही जागा ताब्यात घेण्याबाबत महासभेतदेखील ठराव बहूमताने मंजूर करण्यात आला होता; मात्र, तरीही मनपाकडून याठिकाणी कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न आता हॉकर्स व इतर व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे.