स्टार ८५५
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बनावट व्यक्ती, आधारकार्ड, मतदान कार्ड व इतर खोटी कागदपत्रे सादर करून शेतजमीन व प्लॉट बळकावल्याच्या अडीच वर्षांत जिल्ह्यात १५ तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. भादंवि कलम ४२० अन्वये विश्वासघात, फसवणूक केली म्हणून संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत. या सर्व गुन्ह्यांत संशयितांना अटक झालेली आहे. जिल्हा पेठच्या एका गुन्ह्यात एक बलाढ्य आरोपी अजूनही फरार आहे.
तालुक्यातील उमाळा, कंडारी या भागातील शेकडो एकर जमीन जी अस्तित्वातच नाही अशी काही लोकांना कमी दरात खरेदी करून दिल्याचा प्रकार पाच वर्षांपूर्वी घडला होता. जिल्हाधिकारी कार्यालयानजीक असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयातून या जमिनी खरेदी करून देण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे बनावट व्यक्ती उभ्या करून त्यांची बनावट कागदपत्रे सादर करून हा खरेदी-विक्रीचा प्रकार घडला होता. त्या वेळी दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीही पोलिसांच्या रडारवर आले होते. यात शेकडो लोकांची फसवणूक होऊन त्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. दरम्यान, रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतदेखील प्लॉट व घरांची बनावट व्यक्ती व बनावट कागदपत्रांच्या आधारावर परस्पर विक्री झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. बाहेर जिल्ह्यात राहणाऱ्या या व्यक्तींच्या मालमत्ता हडप करण्यात आल्या होत्या. ही एक साखळीच होती. यातदेखील अनेकांना अटक झाली होती. या महिलेलाही अटक झालेली होती.
जिल्ह्यात लॅण्ड डिसप्युट्स सेल नाही
प्लॉट व जमिनी हडपल्याच्या तक्रारींसाठी मोठ्या शहरांमध्ये पोलीस आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात लॅण्ड डिसप्युट्स सेल कार्यरत आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात या सेलची निर्मितीच झालेली नाही. मुंबई, पुणे व नागपूरसारख्या मोठ्या महानगरात हे प्रकार अधिक असल्याने तेथे हा सेल असतो, ग्रामीण क्षेत्रात अर्थात पोलीस अधीक्षक असलेल्या जिल्ह्यात हा सेल नाही. असे प्रकार घडले तरी थेट संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होतात.
तक्रारीनंतर खरेदी व नोंदी झाल्या रद्द
जळगाव शहरात बनावट कागदपत्रे व बनावट व्यक्ती दाखवून प्लॉट, घर व जमीन हडपण्याच्या तक्रारी झाल्यानंतर त्याचे गुन्हे दाखल झाले. त्यानंतर संबंधित व्यक्तींना अटक करण्यात आलेली असून या खरेदी व नोंदी रद्द करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा पेठ व रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचे दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल झालेले आहे. शहर पोलीस ठाण्यातही असे गुन्हे दाखल झालेले आहेत.
अडीच वर्षांत फसवणुकीचे २२७ गुन्हे
जळगाव जिल्ह्यात २०१९ ते मे २०२१ या कालावधीत फसवणूक अर्थात विश्वासघात केल्याचे २२७ गुन्हे दाखल झालेले आहेत. २०२९ मध्ये ६७ तर २०२० मध्ये ७१ व चालू वर्षात पाच महिन्यांत ८९ गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यात प्लाॅट, जमीन बळकावल्याचे फक्त १५ गुन्हे आहेत. इतर गुन्हे हे नोकरीचे आमिष, वाहन खरेदी, लग्न करताना झालेली फसवणूक यासह वेगवेगळ्या कारणांनी फसवणूक झाल्याचे आहेत. दरम्यान, काही प्रकरणे दिवाणी न्यायालयातही दाखल झालेली आहेत.
कोट...
लॅण्ड डिसप्युट्स सेल आपल्या जिल्ह्यात नाही. फसवणुकीचे जे गुन्हे दाखल आहेत त्यातच प्लॉट, शेती, घर व जमीन बळकावल्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यासाठी स्वतंत्र गुन्हे किंवा तशी यंत्रणा नाही. दाखल गुन्ह्यात आरोपी अटक करणे, न्यायालयात दोषारोपपत्र पाठविणे ही प्रक्रिया केली जाते. सद्य:स्थितीत अशा गुन्ह्यांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक झाल्याचे गुन्हे अनेक आहेत.
- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक
--