लोकमत न्यूज नेटवर्क
फैजपूर : अयोध्येतील जमीन व्यवहाराबद्दल गेल्या काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री महामंडलेश्वर राधे-राधे बाबा (इंदूर) यांनी अयोध्येतील जमीन व्यवहार हा संपूर्ण पारदर्शक असल्याचे स्पष्टीकरण केले. या व्यवहारात कुठलाही भ्रष्टाचार, घोटाळा नसून हे आरोप म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले. तसेच त्यांनी महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेश व राजस्थानच्या धर्तीवर गोवंश हत्येसंदर्भात कडक कायदे करावे, अशी मागणीही केली.
येथील सतपंथ संस्थांच्या आश्रमात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत मागील भूमिका विशद केली. त्यांनी प्रास्ताविकात श्री राम मंदिर निर्माण यासाठी अनेकांनी श्रद्धेने दान दिले आहे. मात्र आज देणगी न देणारे हिशेब मागत आहे, ही शोकांतिका आहे. राधेराधे बाबा यांनी श्रीराम मंदिर निर्माणचे कार्य व्यवस्थित व नियोजनानुसार सुरू आहे. जमिनीचा व्यवहार हा संपूर्ण पारदर्शक आहे. १० वर्षांपूर्वी झालेला हा व्यवहार असून आज मंदिर निर्माणानंतर त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या सोयी सुविधा यासाठी जी जमीन खरेदी होत आहे शासकीय नियमानुसार हा व्यवहार होत आहे. जमीन ट्रस्टच्या नावावर खरेदी करण्यात आली आहे. मात्र त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जनतेला भ्रमित करण्याचे कार्य काही मंडळी करीत आहे. त्यांचा निषेध व्यक्त करीत संत समिती श्रीराम मंदिर ट्रस्टच्या सोबत असल्याचे आवर्जुन सांगितले.
यावेळी त्यांनी श्री राम मंदिर ट्रस्टमध्ये संत समितीचे तीन प्रमुख प्रतिनिधी सदस्य असल्याचेही उल्लेख केला. पत्रकार परिषदेला महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज, सावदा येथील सुरेश शास्त्री मानेकर बाबा, स्वामिनारायण गुरुकुलचे उपाध्यक्ष शास्त्री भक्ती किशोर दास, जामनेरच्या गुरुदेव सेवा आश्रमचे श्यामचैतन्य महाराज, स्वामी प्रभुदास महाराज यांची उपस्थिती होती.
गोमातेला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा
या पत्रकार परिषदेत श्री राधे राधे बाबा यांनी गोमातेला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात यावी. तसेच 'गो' अभयारण्य निर्माण करावी यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने त्यासाठी पुढाकार घ्यावा. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मोठ्या निष्ठेने घेतले जाते. त्यांचे पुत्र आज या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी गोवंश हत्या, कत्तलखाने बंद करण्यासाठी कडक पावले उचलावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.