आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२१ : रामेश्वर कॉलनीतील मंगलपुरी भागात झालेल्या गोळीबारातील गावठी पिस्तुल हे सातपुड्याच्या सिमेतील उमर्टी येथून आल्याचा संशय असून ते कोणामार्फत विशाल अहिरेकडे आले याचा शोध आता पोलीस घेत आहेत. दरम्यान, अहिरे याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता २३ सप्टेबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.विशाल अहिरे याने मंगळवारी दुपारी सागर भालेराव याला जेवणासाठी घरी बोलावले होते. त्यावेळी त्याने तोंडाला पिस्तुल लावून गोळीबार केल्याचा जबाब जखमी सागरने स्वत:च्या हस्ताक्षरात पोलिसांकडे लिहून दिला आहे. त्याने गोळी का मारली याचे कारण मात्र गुरुवारीही समोर आले नाही. अहिरे याच्या घरातून गावठी बनावटीचे पिस्तुल व दोन काडतूस जप्त करण्यात आले आहे.
उमर्टीत घरोघरी तयार होतात पिस्तुलसातपुड्याच्या पायथ्याशी असलेले उमर्टी हे जळगाव जिल्ह्याच्या सिमेलगत असले तरी ते मध्यप्रदेशात येते. येथे आदीवासी घरोघरी हे पिस्तुल तयार करतात. सर्वात जास्त पिस्तुल हे जळगाव जिल्ह्यातच येत असल्याचे वारंवारच्या कारवायांवरुन सिध्द झाले आहे. अहिरे याच्याकडे असलेले हे पिस्तुल देखील उमर्टीचेच असल्याचा संशय पोलिसांना आहे, मात्र ते अहिरेने कोणाच्या माध्यमातून घेतले हे अद्यापही त्याने पोलिसांना सांगितलेले नाही. या दोन दिवसात या गोष्टीचाही उलगडा होईल,असा विश्वास पोलिसांना आहे.आठवडाभरातील तिसरे पिस्तुलया आठवडाभरात हे तिसरे पिस्तुल पोलिसांनी जप्त केले आहे. त्याआधी नेरीजवळ रस्ता लुटीच्या प्रकरणात सराईत गुन्हेगार भूषण उर्फ जिगर बोंडारे याच्याकडून एक पिस्तुल जप्त करण्यात आले तर दुसरे पिस्तुल त्याचा फरार साथीदार गणेश पाटील याच्याकडून जप्त करण्यात आले आहे. याआधी देखील शनी पेठ, स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ पोलिसांनी गावठी पिस्तुल जप्त केले आहेत.संशयिताचे पोलिसांना असहकार्यया गुन्ह्यात अटकेत असलेल्या विशाल अहिरे व जखमी सागर भालेराव या दोघांविरुध्द आर्मअॅक्टचा गुन्हा दाखल आहे. सातत्याने दोन दिवस केलेल्या चौकशी अहिरेने पोलिसांना सहकार्य केलेले नाही. तपासाधिकारी समाधान पाटील व भरत लिंगायत यांनी त्याला गुरुवारी न्या.बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.