जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला असलेल्या २१ वर्षीय विवाहितेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत एका पुरुषाविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संशयित हा पीडितेच्या सासूसोबत काही वर्षांपासून ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये (पती-पत्नी सारखे) राहत आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडिता पतीसह एमआयडीसी परिसरात वास्तव्यास आहेत. पती रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. सासू-सासरे विभक्त झाले असून, सासरे एकटे राहतात. पीडितेच्या खोलीशेजारीच सासू वास्तव्यास असून, घरमालक व सासू असे दोघेही लग्न न करता ‘लिव्ह इन रिलेशन शिप’मध्ये राहतात. पती कामावर निघून गेल्यावर पीडिता घरात एकटी असताना अनेक दिवसांपासून घरमालक अंगलट करण्याचा प्रयत्न करत होता. २ जानेवारीला पीडिता घरी एकटीच असताना अचानक तो घरात आला व त्याने हात धरून पीडितेशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केला म्हणून त्याने पाचशे रुपयांची नोट दाखवून मला अनौतिक संबंध ठेवू दे, यासाठी दबाव टाकला, असे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.