लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : तालुक्यातील गडखांब व धुपी येथे विवाह समारंभास गेलेल्या कुटुंबियांचे दोन बंद घरे भर दुपारी फोडून पाच लाखांच्यावर रोकडसह दागिने लंपास झाल्याची घटना दि. २१ रोजी घडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
गडखांब येथील भरत पंडित पाटील हे कुटुंबियांसह भिलाली येथे विवाहास गेले असता लहान मुलीला घरी टाकून गेले होते. दोन किरकोळ विक्री करणाऱ्या महिलांकडून त्या मुलीने १० रुपयांची वस्तू घेतली आणि त्या मुलीला काहीच समजले नाही. त्यांच्या घरातून तीन लाखांच्या वर रोख रक्कम आणि सुमारे तीन लाखाचे दागिने लंपास केलेत तर धुपी येथील बाळू काशिनाथ पाटील हे गावातच कुटुंबीयांसह विवाहास गेले असता त्यांच्या बंद घरातूनही रोख राकमेसह सोन्याचे दागिने असा १ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
भर दुपारी या घटना घडल्याने खळबळ माजली असून कुटुंबीय घरी परतल्यावर ही घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे विक्री करणाऱ्या महिला सोबत प्लास्टिकचे खेळणे विकणारे लहान मुलेसुद्धा दोन्ही गावात येऊन गेल्याचीही माहिती मिळाली असून दोन्ही कुटुबियांनी रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यासाठी अमळनेर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली होती.