लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या चाळीसगावच्या गुरांच्या बाजाराला कोरोनामुळे टाळे लागले असून, गत महिन्यापासून यामुळे होणारी मोठी उलाढाल ठप्प झाली आहे. २७ फेब्रुवारी रोजी गुरांच्या बाजाराची टाळेबंदी झाली आहे. गुरांच्या खरेदी - विक्री बंदचा फटका शेतकऱ्यांसह ऊसतोड मजुरांना बसतो आहे. बाजार समितीच्या उत्पन्नाला देखील कात्री लागली आहे.
धुळे, मालेगाव, कन्नड, सिल्लोड, पाचोरा व भडगाव, आदी तालुक्यांतूनही चाळीसगावच्या गुरांच्या बाजारात जनावरे विक्रीसाठी येतात. बाजारात पशुपालक मोठ्या संख्येने पशुधन आणत असल्याने व्यवहारातून उलाढालही मोठी होते. एका बाजारात ४० ते ५० लाखांचे खरेदी - विक्रीचे व्यवहार होतात. मात्र, २७ फेब्रुवारीपासून कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बाजार बंद केला गेला आहे. गेले पाच बाजार यामुळे भरले नाही.
साधारणतः अडीच कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. बाजार समितीला या व्यवहारातून एक टक्का कमिशन मिळते. यामुळे बाजार समितीलाही अडीच लाखांचा फटका बसला आहे. गुरांचा बाजार सुरू करण्याची शेतकऱ्यांसह पशुपालक, व्यापाऱ्यांची मागणी आहे. तथापि, कोरोनाचा उद्रेक पाहता बाजार लवकर सुरू होण्याची शक्यता मावळली आहे.
ऊसतोड मजुरांचे गणित बिघडणार
चाळीसगाव तालुक्यातून ५० ते ५५ हजार ऊसतोड मजूर तोडणीसाठी राज्यभर जातात. फेब्रुवारी महिन्यात ते गावी परत येण्यास सुरुवात होते. याच काळात गुरे खरेदीला वेग येतो. यावर्षी हे गणित कोलमडणार आहे. ऊसतोड मजुरांना बैलजोडी खरेदीसह विक्रीसाठीही बाजार सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरवर्षी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे या चार महिन्यांत गुरांच्या बाजारात तेजीचे पर्व असते. यावर्षी कोरोनाने ते ठप्प झाले आहे.
शेतकऱ्यांचीही कसोटी
मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात रब्बीचे उत्पन्न बाजारात आणून शेतकरी खरिपाच्या तयारीचा बिगुल वाजवितात. शेती-शिवारं पुन्हा गजबजून जातात. शेती कसण्यासाठी पिकांची शेतकऱ्यांना चांगली जोड असते. खरिपाच्या तयारीला गुरांची खरेदी करून सुरुवात होते. यावर्षी कोरोनाने ही साखळी तोडली आहे. शेतकऱ्यांचेही गुरे खरेदी - विक्रीचे गणित कोरोनामुळे बिघडले आहे. आहे त्या जनावरांना सोबत घेऊन शेतकऱ्यांना खरिपाच्या तयारीला आणि पुढे हंगामाला देखील सामोरे जावे लागणार आहे.
गेल्यावर्षीही पाच महिने टाळेबंदी
गतवर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर २२ मार्च रोजी टाळेबंदीने गुरांचा बाजारही बंद झाला. पुढचे पाच महिने हे टाळे कायम होते. ऑगस्टमध्ये बाजार भरण्यास सुरुवात झाली.