- किशोर पाटील
जळगाव : एकीकडे राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी शासनाचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत तर दुसरीकडे जळगाव जिल्हा परिषदेच्या २३२ शाळांमधील ६९५ वर्गखोल्या शेवटच्या घटका मोजत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे़. यात २१२ शाळांमधील ५७२ वर्ग खोल्या धोकादायक आहेत. जि़प़चा निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून शाळांच्या दुरुस्तीसाठी धडपड सुरु असल्याचे चित्र आहे़
जिल्हा परिषदेतर्फे पहिली ते आठवी डिजिटल अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांचे गेल्या महिन्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले होते. अभ्यासक्रम डिजिटल असला तरी प्रत्यक्षात तो शिकविला जाणाऱ्या शाळांची दयनीय अवस्था असल्याने सभापती पोपटराव भोळे यांनी पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी केली होती़ पालकमंत्र्याही होकार दर्शवित जिल्हा परिषदेला शाळांच्या स्थितीबाबचा अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने गटशिक्षण अधिकाऱ्यांना किरकोळ दुरुस्ती, मोठी दुरुस्ती, धोकेदायक व जीर्ण इमारती याप्रमाणे शाळाच्या वर्गखोल्याची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले होते़, अशी माहिती सर्व शिक्षा अभियनातील कार्यकारी अभियंता मृदुल अहिरराव यांनी दिली.
शिक्षण विभागाने माहिती संकलित करून याबाबत अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तसेच प्रत्यक्ष भेटीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सादर केला आहे़ त्यामुळे त्यांच्याकडून लवकर निधीची पूर्तता होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
फक्त किरकोळ दुरुस्तीसाठी पालकमंत्र्यांकडून निधीशाळांच्या माहिती अहवालासह मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, प्राथमिक शिक्षण अधिकारी बी.जे.पाटील यांनी मुंबई येथे जाऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती़ त्यानुसार पालकमंत्र्यांनी किरकोळ दुरुस्ती असलेल्या शाळांच्या वर्गखोल्यांसाठी सीएसआरमधून (विशेष निधी) निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. तर मोठी दुरुस्ती असलेल्या वर्गखोल्यांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे़
जिल्हा परिषद शाळांच्या पडक्या खोल्याविषयी माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मोठ्या दुरुस्तीसह धोकादायक खोल्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.- भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. जळगाव.
१८४७ जिल्हा परिषदच्या एकूण शाळा६१४ सुस्थितीत१२३३ शाळांची दयनीय अवस्था२१२ शाळांमधील ५७३ वर्ग खोल्या धोकादायक२३२ शाळांमधील ६९५ वर्गखोल्या पडक्या अवस्थेत८१३ वर्गखोल्यांची मोठी दुरुस्ती६०८ वर्गखोल्याची किरकोळ दुरुस्ती