आकाश नेवे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आयुष्यभर आपल्या मुलांसाठी राबल्यानंतर त्यांनी वृद्धापकाळाचा आधार व्हावा ही प्रत्येक मातापित्याची अपेक्षा असते. मात्र या नात्याला अंतर देणारी दुर्दैवी घटना नुकतीच ममुराबाद शिवारात उघड झाली आहे. एका ८२ वर्षीय वृद्धाला त्यांच्याच मुलांनी ममुराबादच्या शेतशिवारात सोडून दिले. सेवाधर्म परिवारातील सदस्यांनी या वृद्धाला निवारा केंद्रात दाखल केले. मात्र आजारपणामुळे त्यांना परत डाॅ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सेवाधर्म परिवाराचे सदस्य चंद्रशेखर नेवे हे शेतीच्या कामानिमित्त ममुराबादकडे गेले होते. तेथून परत येत असतानाच त्यांना रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाझुडपांमध्ये सीताराम हे पडलेले दिसले. त्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र वृद्धाला मराठी कळते, हिंदी अस्पष्ट का होईना; पण बोलता येते. त्यामुळे त्यांनी हिंदीत संवाद साधला. या वृद्धाच्या जेवणाची त्यांनी व्यवस्था केली. त्यानंतर सेवाधर्म परिवारातील सदस्य दीपेश फिरके यांच्या मदतीने त्या वृद्धाला शहरातील बेघर निवारा केंद्रात आणले. तेथे त्यांना दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांना नवा ड्रेस देत अंघोळ घालण्यात आली. सुरुवातीला सेवाधर्म परिवारातील सदस्यांना हा वृद्ध मनोरुग्ण असेल असे वाटले होते. मात्र त्यांची मानसिक स्थिती नीट असल्याचे लक्षात आले. त्यांना नाव विचारले मात्र त्यांनी स्पष्टपणे कधीही ते सांगितले नाही. आपल्याला जंगलात सोडले म्हणून मुलांवर कारवाई होईल, या भीतीपोटी त्या ‘बापा’ने आपले किंवा मुलांचे कुणाचेही नाव सांगितले नाही. त्यांच्या अंगावर सीताराम चिंधी असे गोंदलेले होते. त्यामुळे बेघर निवारा केंद्रात दाखल करतांना त्यांचे नाव सीताराम चिंधी असेच लिहिण्यात आले.
निवारा केंद्रातून रुग्णालयात दाखल
सीताराम यांना मूळव्याधीचा त्रास आहे. त्यांना दाखल केल्यावर दुसऱ्याच दिवशी सेवाधर्मच्या सदस्यांना केंद्रातून फोन आला. सीताराम यांना रुग्णालयात दाखल करण्यास आणि ते पूर्ण बरे होईपर्यंत तेथेच ठेवण्यास सांगण्यात आले. सेवाधर्म परिवारातील चंद्रशेखर नेवे आणि दीपाली कासार यांनी तातडीने हालचाली करून त्यांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले.
सीताराम म्हणतात, ‘सब मंगल है’
सीताराम यांना झाडाझुडुपांमध्ये असतानाही ते सब मंगल है असेच म्हणत होते. त्यानंतर निवारा केंद्रात त्यांना नवीन कपडे देण्यात आले. तेथेही ते आनंदी दिसत होते. त्यांना आयुष्याच्या या टप्प्यावर कोणत्याही अडचणींचा सामना करताना कसलेही दु:ख होत नसल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत आहे.
केंद्रात दाखल असलेल्या सर्वांच्या उपचाराची व्यवस्था जिल्हा रुग्णालयात केली जाते. सीताराम यांना दाखल केल्यानंतर मूळव्याधीचा त्रास सुरू झाला. त्यांना डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या केंद्रात एक व्यवस्थापक आणि तीन काळजीवाहक आहेत.
मनीषा पारधी, व्यवस्थापक, निवारा केंद्र, जळगाव