विलास बारी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वय वर्ष सत्तर, मधुमेहाचा त्रास. त्यात न्यूमोनिया आणि काेरोनाची लागण अशा कठीण परिस्थितीत जिल्हा रुग्णालयातील आयसीयु कक्षामध्ये उपचार घेतले. १५ दिवसांच्या कालावधीत आपल्या आजूबाजूचे एक दोन नव्हे तर तब्बल १८ रुग्ण मृत्युमुखी पडल्यानंतरही कोरोनाला धोबीपछाड करणार्या लताबाई तोताराम कोल्हे या मृत्युंजयी ठरल्या आहेत.
कोरोनाचे भय आणि भीती काही प्रमाणात आता कमी झाली आहे. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेकांना कसरत करावी लागत होती. जळगाव शहरातील स्नेहल काॅलनीतील लताबाई तोताराम कोल्हे यांना कोरोनाचे निदान झाल्याबरोबर सर्व कुटुंबामध्ये एकच भीती पसरली होती.
रेमडेसिविरमुळे शरीरात उष्णता
१३ सप्टेंबर रोजी त्यांना इकरा कोविड सेंटरमध्ये दाखल केले. मात्र शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाल्यामुळे त्यांना १५ रोजी जिल्हा रुग्णालयातील आयसीयू कक्षात दाखल केले. मधुमेहाचा त्रास असल्यामुळे त्यांच्यावर औषधाची मात्रा काम करीत नव्हती. त्यातच या रुग्णालयातील डाॅक्टरांनी लताबाई यांना रेमडेसिविरचे इंजेक्शन द्यावे लागणार असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. या दरम्यान इंजेक्शनच्या दुष्परिणामाची माहिती दिली. तब्बल सहा ते सात इंजेक्शन दिल्यानंतर शरीरामध्ये प्रचंड उष्णता तयार होऊन जेवण करणे अवघड झाले.
आजूबाजूच्या बेडवरील १८ जणांचा मृत्यू
लताबाई कोरोना वाॅर्डातील ज्या बेडवर होत्या, त्यांच्या आजूबाजूच्या बेडवरील तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला. एका रुग्णाला तर संध्याकाळी लताबाई यांनी नारळाचे पाणी दिले आणि रात्री त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचे भय आजूबाजूला घोंगावत असताना मुलगा राजेंद्र व कुटुंबातील अन्य सदस्यांनी याही परिस्थितीत त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. त्यानंतर लताबाई यांचेदेखील मृत्यूचे भय गायब झाले.
कोरोनाग्रस्त आईसाठी मुले झाले श्रावण बाळ
लताबाई यांचा मोठा मुलगा राजेंद्र यांनादेखील मधुमेह आहे. लहान मुलगा जितेंद्र पुण्याला राहतो. मात्र आईला कोरोनाची लागण झाल्यानंतर मुलगादेखील जळगावात येऊन थांबला. या काळात लहान मुलाने बेड अटेंडन्सची जबाबदारी स्वीकारत आईचे औषधोपचार, जेवणाची जबाबदारी पार पाडली. या काळात मोठ्या मुलाचा व्यवसाय तर ठप्पच झाला. मात्र घरी सुरू केेलेल्या किराणा दुकानाचा व दूध विक्रीचा व्यवसायही ठप्प झाला.
ऑक्सिजन सिलिंडरसाठी रात्री १२ वाजता गाठले शिरसोली
जिल्हा रुग्णालयातून कोरोनामुक्त झाल्यानंतर लताबाई यांना काही दिवस शाहू महाराज रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान ऑक्सिजनची पातळी कायम ठेवण्याचे आव्हान होते. काही दिवस घरी ऑक्सिजन कायम ठेवण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला. मात्र ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था होत नसल्याने पुन्हा चिंता वाढली. शिरसोली येथील एक कोरोनामुक्त आजीसाठी सिलिंडर असल्याची माहिती मिळाली. त्याच दिवशी रात्री १२ वाजता मुलगा राजेंद्र व महेंद्र यांनी सिलिंडर मिळावे यासाठी त्या कुटुंबीयांना विनंती केली. याठिकाणी सिलिंडर मिळाल्यामुळे पुढच्या तीन ते चार दिवसांत लताबाई यांची प्रकृती चांगली झाली. कोरोनाच्या जीवघेण्या संकटातून बाहेर पडल्यानंतर आता कुठे हे कुटुंब स्थिर झाले आहे.