लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिरसोली येथील शिक्षक, कवी स्व. रंगराव बारी लिखीत आणि अथर्व पब्लीकेशन प्रकाशित ‘उमेदकार’ या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा साने गुरुजी फाउंडेशन शिरसोलीतर्फे मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी पत्रकार भवनात पार पडला. ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक बुलडाणा येथील सुरेश कांबळे यांच्या हस्ते या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. हा कविता संग्रह आगामी पिढ्यांसाठी जगण्याची प्रेरणा देणारा असल्याच्या भावना सुरेश कांबळे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
''लोकमत''चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल, अथर्व पब्लीकेशन तसेच अ. भा. मराठी प्रकाशन संघ पुणे, सदस्य युवराज माळी, साने गुरुजी फाउंडेशनचे सचिव भगवान बारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविकात विलास बारी यांनी कविता संग्रहाच्या प्रकाशनामागची भूमिका स्पष्ट केली. संस्थेची कागदपत्रे चाळत असताना रंगराव बारी यांनी लिहिलेल्या कविता डायरीत आढळल्या, रंगराव बारी यांनी कविता प्रकाशनाची इच्छाही व्यक्त केली होती. त्यांच्या ५२ वर्षीय अनुभवांची मांडणी या कविता संग्रहात असून, त्यांच्या इच्छेनुसार हा कविता संग्रह वाचकांसमोर आणत असल्याचे विलास बारी यांनी सांगितले. सूत्रसंचालन बापू पानपाटील यांनी तर आभार साहित्यिक राजेंद्र पारे यांनी मानले. यावेळी ग.स. सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील, मिलिंद केदार, भय्यासाहेब देवरे, मंगल पाटील, प्रकाश दाभाडे, एल. बी. भारूळे, अस्मिता गुरव, विजय लुल्हे, शिवराम शिरसाठ, संगीता माळी, अनिल सुरडकर, रा. श. साळुंके, सुनील सोनवणे, नायब तहसीलदार जितेंद्र पंजे, आर. डी. कोळी, शिवलाल बारी, निषाद बारी, कैलास बारी, रवींद्र बारी, हेमंत नेमाडे, अशोक भाटिया आदी उपस्थित होते.
पहिल्या पुस्तकाचा वेगळाच आनंद- डॉ. बागुल
हा कविता संग्रह २५ दिवसात प्रकाशित झाल्याचे साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल यांनी सांगितले. साहित्यिकाला आपल्या पहिल्या पुस्तकाचा एक वेगळाच आनंद असतो आणि रंगराव बारी आपल्यात नसले तरी या पुस्तकाचा आनंद कायम आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:हून कार्यक्रमाला येण्याचा आग्रह केला, असे बंध रंगराव बारी यांनी जोपासले होते, असेही डॉ. बागुल यांनी सांगितले.
प्रेरणादायी काव्यसंग्रह : सुरेश कांबळे
माणूस आणि मातीचा वास असलेले साहित्य हे चिरकाल टिकणारे असते, आणि रंगराव बारी यांचा हा कविता संग्रह लोकांसाठी प्रेरणादायी असल्याचे विचार साहित्यिक सुरेश कांबळे यांनी व्यक्त केले. एखाद्या पुस्तकामागे लेखकाचे जेवढे कष्ट असतात तेवढेच कष्ट प्रकाशकाचे असतात. रंगराव बारी यांनी त्यांचा भोवतालचा अनुभव या पुस्तकात मांडला आहे. जे सुचतंय ते लिहा, लोकांना ठरवू द्या ते काय आहे ते, असे ते म्हणाले.
पुस्तकात परिपक्व भावना : मिलिंद कुलकर्णी
रंगराव बारी यांनी ५२ वर्षात जे विश्व उभे केले ते अतुलनिय, थक्क करणारे आहे. त्यांच्या भावना, वेगवेगळे अनुभव त्यांनी या कविता संग्रहात व्यक्त केल्या आहेत. असे ''लोकमत''चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. या पुस्तकात परिपक्व भावना आहे. हा दस्तऐवज तयार करून तो लोकांसमोर आणणे, हे मोठे काम आहे. या पुस्तक रूपाने रंगराव बारी यांच्या स्मृती चिरंतन राहतील, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.