यावर्षी ऑगस्ट अखेरपर्यंत पाऊसच न आल्याने व कापूस पिकाची वाढ खुंटल्याने गेल्या दोन-तीन दिवसापासून सुरू असलेला पाऊस उलट कापसासाठी नुकसानकारक असा ठरणार आहे. तर कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी हा पाऊस जलसंजीवनी ठरणार आहे. म्हणून सध्या शेतकऱ्यांमध्ये कहीं खुशी कहीं गम असे चित्र निर्माण झालेले आहे. उशिरा लागवड केलेले कापूस पीक अतिउत्तम आहे. तर मे महिन्याच्या मध्यांतरापासून लागलेल्या कापसाच्या कैऱ्या सडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांची शेतामध्ये कापूस वेचणी सुरू झाल्याने पाण्यामुळे सर्व ओला झालेला आहे. म्हणून हा पाऊस बहुतांश शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरला आहे. असे असले तरी मात्र पिके जरी हातातून जाणार असली तरी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी हा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे.
कोरडवाहू पिके गेली वाया
चोपडा तालुक्यात यावर्षी पाऊस वेळेवर न आल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांनी जवळपास तीनवेळा शेतात बियाणे पेरले मात्र पेरणीनंतर पाऊसच न आल्याने सदर बी पूर्ण क्षमतेने उगवले नाही. तसेच मूग, सोयाबीन, उडीद, मका, ज्वारी, बाजरी, तीड, तीळ, ज्वारी, चवळी, तूर यासारखी पिके पूर्णपणे नष्ट झालेली आहेत. जेमतेम बागायतदार शेतकऱ्यांनी लागवड केलेला कापूस ठिबक सिंचनद्वारे अथवा पाटाचे पाणी भरून वाचविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पाटाचे किंवा ठिबकद्वारे पाणी दिल्याने व वरून पावसाचे पाणीही पडल्याने सर्व फूलपाती गळून पडली. मोठ्या प्रमाणात आलेला प्रथम बहार नष्ट झाला व त्यात पुन्हा जोरदार पाऊस पडला. त्यात शेतामध्ये आता पाणी साचलेले दिसून येते व बहुतांश कापूस पिकावर रोगही पडलेला दिसून येतो. म्हणून गेल्या तीन ते चार दिवसांपासून पडणारा पाऊस शेतीसाठी नुकसानकारक तर भूगर्भातील जलपातळी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
तालुक्याची दिनांक १ स्पटेंबर रोजीची मंडळनिहाय पर्जन्यमान स्थिती:- १. चोपडा - ३८ मि.मी. २. अडावद - २० मि.मी. ३. धानोरा - २८ मि.मी. ४. गोरगावले - ३३ मि.मी. ५. चहार्डी - ४० मि.मी. ६. हातेड - २३ मि.मी. ७. लासूर - ७६ मि.मी. एकूण पर्जन्यमान - २५८ मिमी *सरासरी पर्जन्यमान - ३६.८५ मिमी* यावर्षी आतापर्यंत झालेले पर्जन्यमान -३२७.१४ मिमी. ## पाऊस फायद्याचा:- दरम्यान तालुका प्रभारी कृषी अधिकारी प्रशांत देसाई यांना उशिरा आलेला पाऊस शेती पिकांसाठी फायद्याचा ठरेल काय? असे विचारले असता काही पिकांना फायदेशीर ठरेल तर काही पिकांना नुकसानकारक हा पाऊस ठरणार आहे. उशिरा कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायद्याचा आहे.
कोट
पिण्याच्या पाण्यासाठी व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी हा पाऊस समाधानकारक असा ठरेल. प्रशांत देसाई, प्रभारी तालुका कृषी अधिकारी चोपडा.