लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लक्ष्मीनगरातील लाठी शाळेत असलेल्या मनपा कार्यालयातील तीन संगणक, दोन प्रिंटर्स व इन्व्हर्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना जुलै महिन्यात घडली होती. या चोरट्यांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून, चारपैकी तीन जणांना पकडण्यात यश आले आहे. अविनाश रामेश्वर राठोड (२१, रा. रामेश्वर कॉलनी), दीपक जयलाल पटेल (१९, रा. कुसुंबा) व आकाश उर्फ राधे अजय सोनार (रा. लक्ष्मीनगर) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे असून, गणेश भास्कर सोनार हा चौथा संशयित फरार आहे.
अशी घटली होती घटना
७ जुलै रोजी लक्ष्मीनगर परिसरातील लाठी शाळेमधील महानगरपालिका संस्थेच्या कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तीन संगणक, दोन प्रिंटर्स आणि एक इन्व्हर्टर असे एकूण ६९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संगणक विक्रीसाठी ग्राहकाचा शोध अन् दोघ अडकले पोलिसांच्या जाळ्यात
लक्ष्मीनगरातील एका घरात बसून संगणक व प्रिंटर विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने लक्ष्मीनगरातील त्या घरात अचानक धाड टाकली़ त्यावेळी पोलिसांना अविनाश राठोड व दीपक पटेल हे दोघ चोरीच्या संगणकासह आढळून आले. दोघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी लाठी शाळेतील मनपा कार्यालयात चोरी केल्याची कबुली दिली. तसेच संगणक व प्रिंटर पोलिसांना काढून दिले.
झाडाझडतीत सापडले गावठी पिस्तूलसह सहा जिवंत काडतूस
अविनाश व दीपक यांच्या चौकशी सुरू असताना चोरीच्या वेळी आकाश सोनार व गणेश सोनार हे दोन साथीदार त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले. त्यानुसार आकाश याचा तपास केला असता, तो लक्ष्मीनगरातील घरीच असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन झडती घेतली. त्यावेळी एक गावठी पिस्तूलसह सहा जिवंत काडतूस व एक छऱ्याची पिस्तूल, तलवार, लोखंडी सुरा घरात सापडून आले. पोलिसांनी हत्यार व पिस्तूल जप्त करीत आकाशलाही अटक केली. दरम्यान, गणेश हा बाहेरगावी पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
‘जिगर’ची दुचाकी आकाशच्या दारी
कारागृहातून पलायन करणारा सुशील मगरे याचा साथीदार व कुख्यात सराईत गुन्हेगार जिगर उर्फ भूषण बोंडारे याची दुचाकी आकाश सोनार याच्या घराच्या कम्पाउंडमध्ये आढळून आली. पोलिसांनी तीदेखील जप्त केली. तर आकाश याचा सराईत गुन्हेगारांची संबंध असल्याचे त्यातून समोर आले. दरम्यान, चोरी प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, संजय हिवरकर, राजेश मेढे, रवी नरवाडे, सुनील दामोदरे, पंकज शिंदे, अविनाश देवरे, भगवान पाटील, सचिन महाजन, नंदलाल पाटील, महेश महाजन, जयंत चौधरी आदींच्या पथकाने केली आहे.