आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. २१ : गांधीवादी तसेच सामाजिक कार्यकर्त्या तथा निवृत्त प्राध्यापिका लताताई माधवराव पाटणकर यांचे बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर २२ रोजी सकाळी ९.३० वाजता वावडदा या त्यांच्या कर्मभूमीत अंगणवाडी कायकर्ता प्रशिक्षण केंद्र परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात भाऊ, बहिणी, भाचे असा परिवार आहे.लताताई पाटणकर १० फेब्रुवारी रोजी पुणे येथे त्यांंच्या भाची डॉ. मीरा भालेराव यांच्याकडे गेल्या होत्या व त्यांच्याच दवाखान्यात लताताईंवर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. गुरूवारी सकाळी त्यांचे पार्थिव वावडदा येथे पोहचणार असून लताताईंच्या इच्छेनुसार वावदडा येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.जळगावातील मू.जे. महाविद्यालयात लताताई या राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका होत्या. सुरुवातीपासूनच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या लताताईंनी निवृत्त झाल्यानंतर स्वत:ला सामाजिक कार्यात पूर्णपणे वाहून घेतले. जळगाव तालुक्यातील वावडदा येथे त्यांनी भटक्या, आदिवासी मुलींसाठी वसतीगृहाची सुरुवात करून मुलींना आधार दिला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी अंगणवाडी कार्यकर्ती प्रशिक्षण केंद्र, जळगाव जिल्हा बालकल्याण समितीच्यावतीने दोन पाळणाघरदेखील सुरू केले. या खेरीज शिक्षण प्रसारक मंडळ, खादी ग्रामोद्योग, इंदिरा माधव पाटणकर मुलींचे वसतीगृह, वनवासी कल्याण आश्रम, इंदिराताई पाटणकर नवीन मराठी शाळा, महात्मा गांधी वाचनालय इत्यादी ठिकाणी त्या संचालिका होत्या. अखेरच्या श्वासापर्यंत त्या सामाजिक कार्यात अग्रेसर राहिल्या. राष्टÑसेवादल, समाजवादी पार्टी व सर्वोदयाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम केले. महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरीत असलेल्या लताताईंच्या निधनाने सामाजिक क्षेत्रासह शिक्षण क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत असून भटक्या मुलींची ‘ताई’हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लताताई पाटणकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 8:07 PM
कर्मभूमी वावडदा येथे आज अंत्यसंस्कार
ठळक मुद्देइच्छेनुसार वावदडा कर्मभूमीत अंत्यसंस्कारगुरूवारी सकाळी पार्थिव वावडदा येथे पोहचणार