भुसावळ : शहरात चोर शिरजोर झाले असून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. जामनेर रोडवर दुभाजकावर बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या काही दिवसांपासून चोरी होत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार सुरूच आहे.
भुसावळ शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता असलेल्या जामनेर रोडचे काम केले असता याठिकाणी रस्ता रुंदीकरण करून, रस्त्याच्या मधोमध दुभाजक तर रस्त्याच्या दुतर्फा पादचाऱ्यांसाठी फुटपाथ केले होते. या दुभाजक आणि फुटपाथला लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. पैकी फुटपाथवरील लोखंडी ग्रील्स केव्हाच चोरीला जाऊन अतिक्रमण करण्यात आले आहे. परिसरातील दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने फुटपाथच गायब केले आहेत. तर आता उरलेसुरलेले दुभाजकावरील लोखंडी ग्रील्सदेखील चोरीला जात आहे.
जामनेर रोडवर बाजारपेठ पोलीस ठाण्यापासून ते अष्टभुजा देवी मंदिरापर्यंत दुभाजकावर लोखंडी ग्रील्स बसविण्यात आले असून, हे ग्रील्सदेखील चोरीला जात आहे. या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी रातोरात ग्रील्स कापून चोरी केल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
जामनेर रोडवरील दुभाजकामध्ये लावण्यात आलेले लोखंडी जाळ्या चोरट्यांनी लांबविल्याचे दिसत असून काहीच जाळ्या आता या ठिकाणी आहेत. (छाया : वासेफ पटेल)